
वॉशिंग्टन , 19 डिसेंबर (हिं.स.)।बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाई करण्यासोबतच आता ट्रम्प प्रशासनाने नैसर्गिकरीत्या नागरिकत्व मिळवलेल्या (नॅचरलाइज्ड) नागरिकांचे नागरिकत्व रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे. या निर्णयामुळे हजारो नॅचरलाइज्ड नागरिकांचे नागरिकत्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः आशियाई वंशाच्या नागरिकांमध्ये याबाबत अधिक चिंता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकन माध्यमांच्या एका अहवालानुसार, अमेरिकन नागरिकत्व व स्थलांतर सेवा (युएससीआयएस) विभागातील फील्ड अधिकाऱ्यांना एक अंतर्गत निर्देश जारी करण्यात आला आहे. या निर्देशानुसार दरमहा 100 ते 200 नॅचरलाइज्ड नागरिकांचे नागरिकत्व रद्द करण्याची कारवाई करण्यास सांगितले गेले आहे.
अमेरिकेच्या संघीय कायद्यानुसार नैसर्गिक नागरिकत्व रद्द करण्याची तरतूद आहे. जर नागरिकत्वासाठी अर्ज करताना फसवणूक, चुकीची माहिती देणे किंवा अन्य कोणतीही अनियमितता आढळून आली, तर नागरिकत्व काढून घेता येते. ट्रम्प प्रशासन याच कायदेशीर तरतुदींचा आधार घेत मोठ्या प्रमाणावर नागरिकत्व रद्द करण्याची कारवाई करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.ज्यांच्या नागरिकत्व अर्जात जाणून किंवा अजाणतेपणी कोणतीही चूक झाली असेल, असे लोकही आता ट्रम्प प्रशासनाच्या कारवाईच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नॅचरलाइज्ड नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे,“नागरिकत्व प्रक्रियेदरम्यान खोटे बोलणाऱ्या किंवा स्वतःची चुकीची माहिती सादर करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध आम्ही नागरिकत्व रद्द करण्याची कारवाई करू. अमेरिकेच्या स्थलांतर प्रणालीतील प्रामाणिकपणा पुनर्स्थापित करण्यासाठी आम्ही न्याय विभागासोबत काम करत राहू.”
दरम्यान,युएससीआयएसच्या माजी अधिकाऱ्यांनी ट्रम्प प्रशासनाच्या या नव्या मार्गदर्शक सूचनांबाबत चिंता व्यक्त केली आहे.युएससीआयएसच्या माजी अधिकारी सारा पियर्स म्हणाल्या,
“नागरिकत्व रद्द करण्याच्या प्रकरणांवर मनमानी उद्दिष्टे लादल्यास या प्रक्रियेचे राजकीयीकरण होण्याचा धोका आहे. यामुळे लाखो नॅचरलाइज्ड अमेरिकन नागरिकांमध्ये अनावश्यक भीती आणि अनिश्चितता निर्माण होईल.” अहवालानुसार, गँग सदस्य, आर्थिक फसवणूक करणारे, अमली पदार्थ तस्करीशी संबंधित व्यक्ती आणि हिंसक गुन्हेगार यांचे नागरिकत्व रद्द केले जाऊ शकते.
अमेरिकेत नैसर्गिक नागरिकत्वाची संकल्पना अस्तित्वात आहे. जे लोक अमेरिकेत जन्मलेले नाहीत, पण ठरावीक कायदेशीर प्रक्रियेद्वारे अमेरिकन नागरिक झाले आहेत, त्यांना नॅचरलाइज्ड नागरिक म्हटले जाते. अशा नागरिकांना इतर नागरिकांप्रमाणेच सर्व हक्क प्राप्त असतात.अहवालात जनगणना ब्युरोच्या आकडेवारीचा हवाला देत सांगण्यात आले आहे की, अमेरिकेत सध्या सुमारे 2 कोटी 60 लाख नॅचरलाइज्ड नागरिक आहेत. मागील वर्षीच 8 लाखांहून अधिक लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व मिळवले, ज्यामध्ये भारत, मेक्सिको, फिलिपीन्स आणि व्हिएतनाममधील नागरिकांचा मोठा वाटा होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode