
ढाका, 19 डिसेंबर (हिं.स.) बांगलादेशातील राजकारण आणि रस्त्यांवरील असंतोष आणखी तीव्र झाला आहे. जुलै आंदोलनाचे प्रमुख नेते आणि इंकिलाब मंचाचे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी यांचे सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान निधन झाले आहे. डोक्यात गोळी लागल्यामुळे गंभीर जखमी झालेले हादी सहा दिवस मृत्यूशी झुंज देत होते. त्यांच्या मृत्यूनंतर देशभरात शोक, संताप आणि आंदोलनांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी एक दिवसाच्या राष्ट्रीय शोकाची घोषणा करत दोषींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात अज्ञात हल्लेखोरांनी हादी यांच्या डोक्यात गोळी झाडली होती. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना सिंगापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हादी हे जुलै आंदोलनाच्या अग्रभागी असलेले नेते मानले जात होते आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यांच्या मृत्यूकडे आंदोलनावर झालेला थेट हल्ला म्हणून पाहिले जात आहे.
हादी यांच्या निधनानंतर बांग्लादेशात परिस्थिती आणखी चिघळली. ढाका विद्यापीठ परिसरात ‘जातीय छात्र शक्ति’ या विद्यार्थी संघटनेने शोक मोर्चा काढत गृह सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांचा पुतळा जाळला. हल्लेखोरांना पकडण्यात अपयश आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. तसेच ढाक्यातील शाहबाग चौकात मोठ्या प्रमाणात निदर्शकांनी घोषणाबाजी करत हादी यांना न्याय देण्याची मागणी केली. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमात-ए-इस्लामी यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
याचदरम्यान हादी यांच्या मृत्यूनंतर उसळलेल्या हिंसाचारात माध्यम संस्थांनाही लक्ष्य करण्यात आले. ढाक्यातील करवान बाजार येथील द डेली स्टारच्या कार्यालयावर मध्यरात्रीनंतर जमावाने हल्ला केला. सुमारे चार तास अडकून पडलेले 25 पत्रकार सकाळी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. याआधी जमावाने प्रथोम आलोच्या कार्यालयातही तोडफोड करत आग लावली होती.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये काठ्या, दांडक्यांनी हल्ले आणि रस्त्यावर पेटवलेली आग दिसून येते. अंतरिम सरकारविषयी तुलनेने सौम्य भूमिका असूनही हे वृत्तपत्र का लक्ष्य करण्यात आले, हे स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने देशभरात कडक सुरक्षा लागू करत ‘ऑपरेशन डेव्हिल हंट 2’ सुरू केले आहे. कायदा-सुव्यवस्था ढासळत असताना सरकारने निवडणूक उमेदवार आणि प्रमुख राजकीय व्यक्तींना शस्त्र परवाने देण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची घोषणाही केली आहे.
हादी यांच्या निधनानंतर मोहम्मद युनूस यांनी सांगितले की, हादी हे जुलै आंदोलनाचे निर्भय योद्धा होते आणि त्यांची हत्या अत्यंत दुर्दैवी आहे. हत्याऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. युनूस यांनी एक दिवसाच्या राष्ट्रीय शोकाची घोषणा करत हादी यांच्या पत्नी आणि एकमेव मुलाची जबाबदारी सरकार घेईल, असेही जाहीर केले. नागरिकांनी शांतता आणि संयम राखावा, असे आवाहन त्यांनी केले. तर इंकिलाब मंचने इशारा दिला आहे की, जोपर्यंत हल्लेखोरांना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील आणि गरज पडल्यास संपूर्ण देश ठप्प केला जाईल. आरोपी भारतात पळून गेले असतील, तर भारत सरकारशी चर्चा करून त्यांना परत आणावे, अशी मागणीही मंचने केली आहे.
हादी यांच्या मृत्यूमुळे बांगलादेश पुन्हा एकदा अस्थिरतेच्या काळात सापडला आहे. आता सरकार हत्याऱ्यांना किती लवकर पकडते आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode