अचलपूर नगराध्यक्ष 20 फेऱ्यानंतर समजणार तर नांदगाव, धामणगाव तिसऱ्या फेरीला
अमरावती, 19 डिसेंबर (हिं.स.) जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या अचलपुरच्या नगराध्यक्षपदाचा निकाल हा तेथील मतमोजणीच्या २० व्या फेरीअखेर कळणार असल्याने दुपारी ३ वाजताच्या दरम्यान तेथील नवे नगराध्यक्ष कोण, हे माहित होईल. त्याचवेळी सर्वात कमी प
कोण होणार नगराध्यक्ष ? अचलपूर नगराध्यक्ष 20 फेऱ्यानंतर समजणार तर ; नांदगाव, धामणगाव तिसऱ्या फेरीला


अमरावती, 19 डिसेंबर (हिं.स.) जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या अचलपुरच्या नगराध्यक्षपदाचा निकाल हा तेथील मतमोजणीच्या २० व्या फेरीअखेर कळणार असल्याने दुपारी ३ वाजताच्या दरम्यान तेथील नवे नगराध्यक्ष कोण, हे माहित होईल. त्याचवेळी सर्वात कमी प्रत्येकी तीन फेऱ्यांमध्ये नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे आणि शेंदुरजनाघाटची मतमोजणी आटोपणार असल्याने तेथील नगराध्यक्ष हे दुपारी १२ च्या दरम्यान स्पष्ट होतील, असा अंदाज आहे.

जिल्ह्यातील ९ नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका गेल्या २ डिसेंबर रोजी पार पडल्या, तर अंजनगाव सुर्जी नगरपालिकेची निवडणूक २० डिसेंबरला होत असून सर्व बाराही नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल २१ डिसेंबरला घोषित होत आहे. त्यामुळे अगदी दोन दिवसांवर आलेल्या नगरपालिका, नगरपंचायतींच्या निकालाबद्दल नागरिकांची उत्सुकता बरीच ताणली आहे. अचलपुर ही जिल्ह्यातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका आहे.

येथील नगरसेवकांची संख्याही सर्वाधिक ३९ आहे. मतमोजणीचा क्रम नगरसेवक आधी आणि नगराध्यक्ष नंतर असा ठरला असल्याने प्रत्येक फेरीअखेर दोन नगरसेवकांचा निकाल घोषित होईल. अशाप्रकारे २० व्या फेरीअखेर सर्व ३९ नगरसेवकांची घोषणा होणार असून या निकालानंतर तेथील नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार कोण, हे माहित होईल. जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीनुसार शेवटून दुसऱ्या क्रमांकावर म्हणजेच दुपारी २ च्या सुमारास चांदूर रेल्वेचा निकाल घोषित होईल. या ठिकाणी ८ फेऱ्या होणार आहेत. तर दर्यापुरात सातव्या आणि अंजनगाव सुर्जी व चांदूरबाजार येथे सहाव्या फेरीअखेर निकाल घोषित होईल. धारणी व चिखलदऱ्यात पाचव्या फेरीअखेर, तर मोर्शी व वरुड येथे चौथ्या फेरीअखेर तेथील नवे नगरसेवक आणि नगराध्यक्ष कळतील. मतमोजणीसाठी तीन ठिकाणी नगरपालिका कार्यालयांची निवड करण्यात आली असून चार ठिकाणी तहसील कार्यालयांची निवड करण्यात आली आहे.

नांदगाव खंडेश्वर येथील मतमोजणी तेथील शासकीय आयटीआयमध्ये होणार असून अचलपुरची मतमोजणी कल्याण मंडपम येथे केली जाणार आहे. नगरपालिका/नपं मतदान टक्के अचलपूर ६९.७३ वरुड ६४.०७ दर्यापूर ६८.६६ मोर्शी ६५.७८ चिखलदरा ८५.२३ शेंदुरजना घाट ७३.५३ चांदूर रेल्वे ६८.४९ चांदूर बाजार ६७.१३ धामणगाव रेल्वे ६७.२१ धारणी नपं. ६४.४३ नांदगाव खंडेश्वर नपं. ७३.३० एकूण ६८.३८ नगरपालिका टेबल फेऱ्या अचलपूर १२ २० अंजनगाव सुर्जी १० ६ दर्यापूर ६ ७ वरुड १४ ४ चांदूर रेल्वे ७ ८ चिखलदरा २ ५ चांदूर बाजार ६ ६ शेंदुरजना घाट ७ ३ धामणगाव रेल्वे ७ ३ मोर्शी १२ ४ नांदगाव खं. (न.पं.) ६ ३ धारणी (न.पं.) ४ ५ मतमोजणीची व्यवस्था ही झालेल्या मतदानाच्या संख्येनुसार करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे सर्वात कमी टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी केवळ दोन टेबल ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एका फेरीत केवळ दोन इव्हीएममधील मतांची नोंदणी केली जाईल. अशाप्रकारे पाच फेऱ्यांअखेर येथील नगराध्यक्षांचा निकाल कळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande