

रायगड, 19 डिसेंबर (हिं.स.)।
वारंवार लेखी तक्रारी करूनही शासकीय पातळीवर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे यांनी अनोख्या पद्धतीने थेट शासकीय कार्यालयात धडक देत आपला जाहीर निषेध नोंदवला. निषेधाचे वस्त्र परिधान करून त्यांनी तहसील कार्यालय, अलिबाग येथे जाऊन तहसीलदार श्री. विक्रांत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेत संबंधित प्रकरणावर तात्काळ व योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली.
प्रल्हाद म्हात्रे यांनी सांगितले की, संबंधित विषयावर गेल्या काही महिन्यांपासून ते सातत्याने लेखी स्वरूपात तक्रारी व पत्रव्यवहार करत आहेत. मात्र, तक्रारींची दखल न घेतल्याने प्रशासनाकडून केवळ आश्वासनांचीच पुनरावृत्ती होत आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने आणि शांततापूर्ण पद्धतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा अनोखा निषेध करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तहसीलदार विक्रांत पाटील यांच्याशी झालेल्या भेटीत प्रल्हाद म्हात्रे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करण्याचे तसेच दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी “केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्षात कृती दिसली पाहिजे,” अशी ठाम भूमिका मांडली.
यापूर्वीही प्रल्हाद म्हात्रे यांनी चेंढरे ग्रामपंचायत यांना लाक्षणिक उपोषणाबाबत लेखी सूचना दिली होती. त्या वेळी कार्यवाही करण्याचे आश्वासन देत त्यांना उपोषणास बसू नये, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने अखेर त्यांनी जाहीर निषेधाचा मार्ग अवलंबल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेमुळे स्थानिक पातळीवर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. आता प्रशासनाकडून प्रत्यक्ष चौकशी व ठोस कारवाई होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके