
अॅडलेड, 20 डिसेंबर (हिं.स.)पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांच्या शानदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या अॅशेस कसोटीत इंग्लंडवर आपली पकड घट्ट केली आहे. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात 6 बाद २०७ धावा केल्या होत्या आणि त्यांना विजयासाठी अजूनही २२८ धावांची आवश्यकता आहे. खेळ थांबला तेव्हा विल जॅक ११ धावांवर आणि जेमी स्मिथ दोन धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियाकडून कमिन्स आणि लायनने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, ट्रॅव्हिस हेडच्या शतक आणि अॅलेक्स कॅरीच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या अॅशेस कसोटीच्या दुसऱ्या डावात ३४९ धावा केल्या. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने एकूण ४३४ धावांची आघाडी मिळवली आणि इंग्लंडसमोर ४३५ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली ज्यामुळे त्यांना पराभवाचा धोका निर्माण झाला. ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी आणि अॅशेस मालिका राखण्यापासून चार विकेट्स दूर आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सर्वबाद झाल्यानंतर इंग्लंडची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने सलामीवीर बेन डकेटला बाद केले. जो चार धावांवर बाद झाला. त्यानंतर जॅक क्रॉलीने ओली पोपसह डाव सुरू ठेवला. पण कमिन्सने इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. कमिन्सने पोपला बाद केले. पोप २९ चेंडूत १७ धावांवर बाद झाला, ज्यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता.
पॅट कमिन्सने जो रूटला बाद करून ऑस्ट्रेलियाला तिसरे यश मिळवून मिळवून दिले. रूट आणि जॅक क्रॉलीने तिसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. सुरुवातीच्या अपयशानंतर रूट आणि क्रॉलीने इंग्लंडला सावरले आणि चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना रोखले. पण तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला कमिन्सने इंग्लंडला तिसरा धक्का दिला. रूटने ६३ चेंडूत ३९ धावा काढून बाद झाला, ज्यामध्ये पाच चौकारांचा समावेश होता.
जॅक क्रॉलीने आणि हॅरी ब्रूकने चौथ्या विकेटसाठी एक उत्तम भागीदारी केली आणि इंग्लंडला १५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. क्रॉलीनेही डावादरम्यान अर्धशतक झळकावले. क्रॉली-ब्रुकची भागीदारी ऑस्ट्रेलियासाठी अडचणीची ठरत होती. पण नॅथन लायनने हॅरी ब्रुकला बाद केले. क्रॉली आणि ब्रुकने चौथ्या विकेटसाठी ६८ धावा जोडल्या. ब्रुकने ५६ चेंडूत ३० धावा केल्या, ज्यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता. त्यानंतर लायनने कर्णधार बेन स्टोक्सला बाद केले. स्टोक्स पाच धावा करून बाद झाला. त्यानंतर लायनने आपली शानदार गोलंदाजी सुरू ठेवली आणि जॅक क्रॉलीला बाद करून इंग्लंडला सहावा धक्का दिला, ज्याने १५१ चेंडूत ८ चौकारांसह ८५ धावा केल्या.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाची त्यांच्या दुसऱ्या डावात ४ बाद २७१ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेड आणि अॅलेक्स कॅरी यांनी डाव सावरला. या दोन्ही फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी केली आणि ऑस्ट्रेलियाची आघाडी ३०० च्या पुढे नेली. जोश टंगने हेडला बाद करून ही भागीदारी मोडली. हेडने २१९ चेंडूत १६ चौकार आणि दोन षटकारांसह १७० धावा केल्या. त्यानंतर लवकरच कॅरी देखील बाद झाला. कॅरीने १२८ चेंडूत ७२ धावा केल्या, ज्यामध्ये सहा चौकारांचा समावेश होता. हेड आणि कॅरी बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सर्वबाद झाला. जोश इंग्लिसने १०, कमिन्सने ६ आणि बोलँडने १ धावा केल्या, तर स्टार्कने सात धावा केल्या. इंग्लंडकडून टँगने चार, तर ब्रायडन कार्सने तीन विकेट्स घेतल्या. जोफ्रा आर्चर, विल जॅक्स आणि स्टोक्सने प्रत्येकी एकेक विकेट घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे