
मुंबई, 20 डिसेंबर, (हिं.स.) - अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष निवड समितीने शनिवारी जागतिक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मुख्यालयात झालेल्या बैठकीत हा संघ निवडण्यात आला. शुभमन गिलला टीम इंडियातून वगळण्यात आले आहे. गिल पूर्वी उपकर्णधार होता. पण आता ती जबाबदारी अक्षर पटेलकडे सोपवण्यात आली आहे. गिल टी-२० मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये नाही. दरम्यान, यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन आणि रिंकू सिंगचे संघात पुनरामगन झाले आहे. रिंकू आशिया कपचा भाग होता. पण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याचा समावेश केला गेला नव्हता.
टी-२० विश्वचषक संघाची घोषणा करताना निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी सांगितले की, संयोजनाच्या कारणांमुळे गिलला वगळण्यात आले आहे. संघ व्यवस्थापनाला वरच्या फळीत एका यष्टीरक्षकाला खेळवायचे आहे, म्हणूनच शुभमन गिलला वगळण्यात आले आहे आणि संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. त्याचा बॅकअप यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून इशान किशनचाही समावेश करण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेत गिलला संघात स्थान का देण्यात आले नाही असे विचारले असता, कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, गिलला त्याच्या फॉर्ममुळे नाही तर संघाच्या रचनेमुळे वगळण्यात आले आहे. त्याने सांगितले की, त्यांना वरच्या क्रमांकावर विकेटकीपर फलंदाज हवा होता.
गेल्या १८ टी-२० सामन्यांमध्ये गिलची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. या काळात त्याने एकही अर्धशतक झळकावलेले नाही. २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने एकमेव सामना जिंकून देणारी खेळी केली होती, जिथे त्याने २८ चेंडूत ४७ धावा केल्या होत्या. टॉप ऑर्डरमध्ये खेळताना गिलला त्याच्या बॅटने धावा काढता आल्या नाहीत. धावांचा दुष्काळ इतका तीव्र होता की, त्याला आज टी-२० विश्वचषकातून बाहेर रहावे लागले आहे.
शुभमन गिलच्या जागी अक्षर पटेलला टी-२० संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अक्षरने यापूर्वी टी-२० मध्ये उपकर्णधार म्हणून काम पाहिले आहे. विशेष म्हणजे इशान किशन संघात परतला आहे. किशनने अलिकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात १०१ धावा केल्या. तो संपूर्ण स्पर्धेत उत्तम फॉर्ममध्ये होता. पण इशानच्या समावेशामुळे जितेश शर्माला संघातून वगळण्यात आले आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून ट्रॉफी जिंकली. भारत या स्पर्धेत विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशाने प्रवेश करेल. ही या स्पर्धेची १० वी आवृत्ती असेल. आतापर्यंत या स्पर्धेत कोणताही संघ आपले विजेतेपद राखू शकलेला नाही, त्यामुळे टीम इंडियाला घरच्या मैदानावर हा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन (यष्टीरक्षक)
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे