
रत्नागिरी, 20 डिसेंबर, (हिं. स.) : चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे सलग पाचव्या वर्षी चिपळूण सायक्लोथॉन उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या गुरुवारी, दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता सायक्लोथॉन सुरू होणार आहे.
सायकल फेरीची सुरुवात इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून होईल. हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांपासून ते सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुषांसाठी खुला असून, सायकलिंगद्वारे नियमित व्यायामाची सवय लागावी, आरोग्याबाबत जागरूकता वाढावी तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश समाजात पोहोचावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सायक्लोथॉनचा मार्ग असा आहे - इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, एम. के. थिएटर, पटेल प्लाझा, भेंडी नाका, उक्ताड, गोवळकोट कमान, टंडन रोड, गोवळकोट कमान, एन्रॉन ब्रिज, फरशी तिठा, गांधारेश्वर ब्रिज, रामतीर्थ मार्गे पुन्हा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र. ही सायकल फेरी सुमारे १८ किलोमीटर अंतराची आहे.
दरवर्षी या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या सायकलिस्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, सहभागींची वयोमर्यादाही विस्तारत आहे. गेल्या वर्षी १० ते ६४ वर्षे वयोगटातील सायकलिस्ट्सनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. निरनिराळ्या स्पर्धांमध्ये तसेच राष्ट्रीय स्तरावर सहभागी होणाऱ्या चिपळूणमधील अनेक नावाजलेल्या व प्रख्यात सायकलिस्ट्सची सायकलिंगमधील वाटचाल याच उपक्रमातून सुरू झाली. त्यामुळे नवोदित सायकलिस्ट्ससाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
सायक्लोथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागी सायकल रायडर्सना पदक देण्यात येणार आहे. या उपक्रमादरम्यान सायकलिंगचे फायदे, सायकलिंग स्पर्धांचे प्रकार, तंत्रशुद्ध सायकल चालवण्याची पद्धत, योग्य सायकलची निवड आदी विषयांवर मार्गदर्शनपर माहिती देण्यात येणार आहे. सहभागासाठी नोंदणी आवश्यक आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर संकेतस्थळावर नोंदणी करून सहभाग निश्चित करावा, असे आवाहन चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे करण्यात आले आहे.
नोंदणी संकेतस्थळ : www.chipluncyclingclub.in
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी