
लातूर, 20 डिसेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात अत्यंत उत्साहात साजरा होणारा कृषी संस्कृतीचा सण म्हणजेच 'वेळ अमावस्या'. याच सणाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या मूळ गावी, शिरूर ताजबंद (ता. अहमदपूर) येथे सहकुटुंब वेळ अमावस्या साजरी केली.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ना. पाटील यांनी आपल्या शेतात जाऊन मातीची (काळ्या आईची) मनोभावे पूजा केली. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी पाच पांडवांचे पूजन केले आणि आगामी हंगामात बळीराजाला सुख-समृद्धी लाभो, अशी प्रार्थना केली. यावेळी शेतातच तयार करण्यात आलेल्या पारंपरिक 'भज्जी' (मिक्स भाजी) आणि 'कण्या' या पदार्थांचा त्यांनी सहकुटुंब आस्वाद घेतला.
या स्नेहभोजनाच्या प्रसंगी ना. बाबासाहेब पाटील यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. चंदाताई पाटील, सभापती मंचकराव पाटील, सिद्धी शुगरचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, ग्रामपंचायत सदस्य युवराज पाटील यांच्यासह पाटील परिवारातील इतर सदस्य आणि स्नेही उपस्थित होते.
परंपरेचे जतन
मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळतानाही आपल्या ग्रामीण संस्कृतीशी आणि मातीशी असलेली नाळ ना. बाबासाहेब पाटील यांनी कायम ठेवली आहे. शिरूर ताजबंद परिसरातील ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला असून, मंत्र्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष उत्साह प्राप्त झाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis