
छत्रपती संभाजीनगर, 20 डिसेंबर (हिं.स.) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६६ व्या दीक्षांत समारंभाची जय्यत तयारी सुरु आहे. समारंभाच्या यशस्वीतेसाठी २५ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा दीक्षांत समारंभ नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात संपन्न होणार आहे. कुलपती तथा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अध्यक्षतेखाली ५ जानेवारी रोजी हा सोहळा होणार असून पुणे येथील राष्ट्रीय संस्था 'आयसर'चे संचालक डॉ.सुनील भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत राहणार आहेत. विद्यापीठाच्या नाट्यगृहात हा सोहळा येत्या ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संप्पन्न होणार आहे. कार्यक्रमास अध्यक्ष व पाहुण्यांसह कुलगुरू डॉ.विजय फुलारी, प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी एन डोळे यांच्यासह चारही विद्याशाखांचे अधिष्ठाता तसेच व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.मा.कुलपती तथा राज्यपाल आचार्य देवव्रत हे पहिल्यांदाच विद्यापीठात येणार आहेत. तर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर, पुणे) संचालक डॉ.सुनील भागवत प्रमुख पाहुणे म्हणून दीक्षांत भाषण देणार आहेत.
या दीक्षांत समारंभात ऑक्टोबर- नोव्हेंबर २०२४ व मार्च-एप्रिल २०२५ या परीक्षेत उत्तीर्ण पदवीधारकांना पदव्यांचे वितरण करण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षेत पदविका, पदवी, पदव्यूत्तर पदवी प्राप्त विद्यार्थी तसेच २३ फेब्रुवारी २०२५ ते आजपर्यंत एमफिल, पीएच.डी प्राप्त करणा-या संशोधकांना पदव्यांचे वितरण करण्यात येईल, असे परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. बी एन डोळे यांनी कळविले आहे. दीक्षांत सोहळ्यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने पदवीधारकांना आवाहन करण्यात आले आहे. ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२४ आणि मार्च/ एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण व पदवीस पात्र स्नातकांना त्या-त्या पदव्यांचा अनुग्रह करता येणार आहे . त्यास्तव पदवीस पात्र स्नातकांना उपस्थितीत व अनुपस्थितीत पदव्यांचा अनुग्रह करण्यासाठी पदवी आवेदनपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पात्र अशा स्नातकांनी पदवी आवेदनपत्र २१ डिसेंबरपर्यंत विद्यापीठाच्या परीक्षा विभागात पदवी आवेदनपत्रासाठी लागणा-या सर्व आवश्यक कागदपत्रासह सादर करावीत. अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. २१ डिसेंबर रोजी रविवारची सुट्टी असली तरी परीक्षा भवनमधील संबंधित विभाग सुरू ठेवण्यात येणार आहे.
दीक्षांत समारंभासाठी स्थापन करण्यात आलेल्या २५ समित्यांच्या अध्यक्षांची बैठक बुधवारी दि.१७ परीक्षा भवनात घेण्यात आल. यावेळी कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर व परीक्षा मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.बी.एन.डोळे उपस्थित होते. सभारंभाच्या यशस्वीतेसाठी सर्व समित्यांचे जय्यत व सर्व सदस्य नेटाने कामाला लागले आहेत. हा समारंभ अत्यंत देखणा व नेटकेपणाने आयोजित करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis