
पुणे, 20 डिसेंबर (हिं.स.)इंदापूर येथे २०१२ मध्ये झालेल्या ऊस दर आंदोलनाप्रकरणी दाखल केलेल्या नऊ गुन्ह्यांपैकी तीन गुन्ह्यांतून माजी खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह ५१ जणांची इंदापूर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. शेतकरी संघटनेच्या वतीने सन २०१२मध्ये ऊस दराबाबत आंदोलन करत प्रतिटन २,७०० रुपये पहिली उचलीची मागणी केली होती. तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पदाची जबाबदारी स्वीकारून तोडगा काढावा म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या इंदापूर येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यावर धरणे आंदोलन करण्यात आले होते. मात्र, तरीही योग्य दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे सोलापूर-पुणे महामार्गावर रास्ता रोको झाल्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढली. यामध्ये कुंडलिक कोकाटे या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु