
बीड, 20 डिसेंबर (हिं.स.)। शेतकरी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित २५ व्या गंगाई बाबाजी रौप्य महोत्सवाचे उद्घाटन सोमवार, २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी शिक्षण महर्षी माजी आमदार भीमराव धोंडे राहणार आहेत.
आयोजन भगवान महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. महोत्सवासाठी जय्यत तयारी झाली आहे. आष्टी शहरात ठिकठिकाणी भव्य फलक लावण्यात आले आहेत. महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. हजारो प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. साहित्य, सामाजिक कार्य, जीवनगौरव, शिक्षण, पत्रकारिता, कला, क्रीडा, कृषी, अध्यात्म, शौर्य, प्राणीमित्र, आदर्श माता-पिता, आदर्श अधिकारी, उद्योग, विधी आणि वैद्यकीय सेवा या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना गंगाई बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला आष्टी पंचक्रोशीतील कला, साहित्य आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार भीमराव घोडे, संस्थेचे संचालक डॉ. अजयदादा धोंडे, अभयराजे घोडे, उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव वैद्य, डॉ. आप्पासाहेब टाळके, प्राचार्य सुरेश बोडखे, डॉ. बाळासाहेब खेमगर, मुख्याध्यापक संतोष थोरवे, ज्ञानेश्वर राऊत, डॉ. उमाकांत बनाळे, एस.जी. निशिगंध, डॉ. बाळासाहेब गावडे, डॉ. दिगंबर पाटील यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis