नांदेड - लिंबोटी येथील लाल कंधारी वळू ठरला माळेगाव चॅम्पियन
नांदेड, 20 डिसेंबर, (हिं.स.)। श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पशुधन स्पर्धांना पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धांमध्ये विविध गटांतील उत्कृष्ट पशुधनांची निवड
नांदेड - लिंबोटी येथील लाल कंधारी वळू ठरला माळेगाव चॅम्पियन


नांदेड, 20 डिसेंबर, (हिं.स.)। श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पशुधन स्पर्धांना पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धांमध्ये विविध गटांतील उत्कृष्ट पशुधनांची निवड करण्यात आली.

लाल कंधारी वळू गटात कंधार तालुक्यातील लिंबोटी येथील पशुपालक परसराम नागनाथराव सापनर यांचा लाल कंधारी वळू माळेगाव चॅम्पियन ठरला. तर मादी कालवड गटात लातूर तालुक्यातील कुणकी येथील परमेश्वर प्रभाकर केंद्रे यांची कालवड चॅम्पियन ठरली. या दोन्ही विजेत्या पशुपालकांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

देवणी नर गटात उदगीर तालुक्यातील नेत्रगाव येथील रज्जाकअली उस्मानअली पटेल यांचा देवणी नर चॅम्पियन ठरला. तसेच जळकोट तालुक्यातील कुणकी येथील बालाजी मारुती केंद्रे यांची देवणी गाय वर्गीय चॅम्पियन म्हणून निवड झाली. या दोघांना प्रत्येकी ७१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

माळेगाव यात्रेत दरवर्षी लाल कंधारी व देवणी गाय वर्गीय पशुधन स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यंदा या स्पर्धांच्या पारितोषिक रकमेत लक्षणीय वाढ करण्यात आल्याने राज्यातील विविध भागांतील पशुपालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या यात्रेत अश्व, शेळी, श्वान, कुकुट तसेच दुग्ध स्पर्धा देखील घेण्यात आल्या असून, सर्व स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. सदर स्पर्धांबाबतची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. राजकुमार पिडले, सह आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले व डॉ. पुरी यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande