
पुणे, 20 डिसेंबर, (हिं.स.)। वाचनसंस्कृतीचा जागर करणाऱ्या, पुस्तकांच्या दुनियेतून विचारांची देवाणघेवाण घडविणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाला आतापर्यंत सात लाखांहून अधिक वाचनप्रेमींनी भेट दिली आहे. पुस्तकांनी फुललेल्या दालनातून अखंडपणे वाहणारा ज्ञानाचा प्रवाहाने खऱ्या अर्थाने ज्ञानोत्सव ठरणाऱ्या या महोत्सवाला पुणेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महोत्सवात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुस्तक खरेदीबरोबरच महोत्सवात आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रम हेही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. लेखक-वाचक संवाद, कवी संमेलन, चर्चासत्रे, पुस्तक प्रकाशन, तसेच विविध कला-सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वाचनप्रेमींचा उत्साह वाढत आहे.
वाचकांकडून पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. पुणे पुस्तक महोत्सवाचे आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. अधिकाधिक पुणेकरांनी या संधीचा लाभ घ्यावा, सवलतीच्या दरात दर्जेदार पुस्तके खरेदी करावीत आणि विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु