
पुणे, 20 डिसेंबर, (हिं.स.)। निवडणूक प्रचारासाठी सभा किंवा कोपरा सभा घेताना महापालिकेचे मैदान अथवा अन्य जागेचा वापर केल्यास उमेदवार किंवा राजकीय पक्षांना शुल्क मोजावे लागणार आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या दरानुसार चौक सभेसाठी १८ हजार; तर कोपरा सभेसाठी सात हजार २०० रुपये शुल्क घेतले जाणार आहे. विनापरवानगी सभा घेतल्यास दीड पट दंडासह रक्कम वसूल केली जाणार आहे.
महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्याने पुण्यात इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून जागा वाटप, इच्छुकांच्या मुलाखती, गाठीभेटी सुरू आहेत. उमेदवारी जाहीर होत नाही, तोपर्यंत आपले काय होणार? या विचाराने इच्छुक उमेदवार ग्रासले आहेत. दुसरीकडे महापालिकेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मतदान केंद्र निश्चित करणे, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक यंत्रणा सक्षम करण्याचे काम सुरू आहे.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पात्र उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाईल. त्यानंतर तीन जानेवारीपासून प्रचार सुरू होईल. उमेदवारांकडून पदयात्रा, कोपरा सभा, चौक सभा घेतल्या जातात. घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराशी संपर्कही साधला जातो. परंतु, एक लाख मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने सभा, कोपरा सभांवर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने दर निश्चित केले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु