
सोलापूर, 20 डिसेंबर, (हिं.स.)कुस्तीतून दोस्तीच्या मार्गावर आलेल्या आ. सुभाष देशमुख आणि आ. विजयकुमार देशमुख यांचे महत्त्व कमी करत भाजपने शेजारच्या अक्कलकोटच्या आ. सचिन कल्याणशेट्टींना महानगरपालिका निवडणूक प्रमुख केले. त्यामुळे आमदारद्वय देशमुखांचे पक्षांतर्गत महत्त्व कमी करण्याचा डाव स्पष्ट झाला, तर तुलनेने नवखे आ. देवेंद्र कोठे आणि शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांना निवडणुकीत फ्री हॅण्ड देण्याचा पक्षाचा विचार दिसून येत आहे.
यामुळे आमदारद्वय देशमुख गोपनीय पद्धतीने एखादी ‘तिरपी चाल’ खेळू शकतात, अशी चर्चा आहे. एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर सध्यातरी सोलापुरात महायुतीत नव्हे तर भाजप विरुद्ध भाजप सामना रंगल्याचे दिसून येत आहे.
आमदारद्वय देशमुखांना पक्षाने पुष्कळ वेळा संधी देत त्यांच्यातील विसंवाद मिटवून घेण्याचे संकेत दिले होते. मात्र, मध्यंतरीच्या काळात या दोघातील वाद विकोपाला गेल्याने पक्षाचे तसेच महापालिकेतील सत्तास्थानाचे खूप नुकसान झाले होते. त्या आठवणी ताज्या असतानाच यंदाच्या महापालिका निवडणुकीत आमदारद्वय देशमुखांना पक्षांने सुरक्षित अंतरावर ठेवल्याचे दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड