अंबरनाथमध्ये बोगस मतदानाचा आरोप; राजकीय आरोप-प्रत्यारोप
अंबरनाथ, 20 डिसेंबर (हिं.स.)। नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान कोहोजगाव परिसरात बोगस मतदानाच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मतदानाच्या दिवशी पहाटे एका सभागृहात शेकडो महिला आणि पुरुषांची गर्दी जमल्याचे निदर्शनास आल्यानंतर काँग्रेस आणि भाजपच्या कार
Allegations Voting  Ambernath


अंबरनाथ, 20 डिसेंबर (हिं.स.)। नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान कोहोजगाव परिसरात बोगस मतदानाच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मतदानाच्या दिवशी पहाटे एका सभागृहात शेकडो महिला आणि पुरुषांची गर्दी जमल्याचे निदर्शनास आल्यानंतर काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे सर्व मतदार बोगस असल्याचा आरोप केला. हे लोक भिवंडीहून अंबरनाथमध्ये मतदानासाठी आणले असल्याचा दावा करत कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि वातावरण तणावपूर्ण बनले.

राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी मतदान होत असताना, अंबरनाथमधील या घटनेने राजकीय वातावरण तापवले. कोहोजगावमधील सभागृहात मोठ्या संख्येने जमलेल्या महिला व पुरुषांना पाहून काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. प्रतिस्पर्धी (शिवसेना शिंदे गट) उमेदवाराकडून बोगस मतदानासाठी या महिला आणल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सभागृहातील महिलांना बाहेर काढत चौकशी सुरू केली.

अंबरनाथ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 208 महिला आणि मुलं या ठिकाणी आढळून आली असून ते स्थानिक नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हे सर्वजण भिवंडीहून आल्याची माहिती असून, ते मतदानासाठीच आणले गेले होते का याची खात्री करण्यासाठी फिरते पथक तपास करत आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल लवकरच समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, बोगस मतदारांच्या आरोपांसोबतच पैसे वाटपाचाही आरोप समोर आला आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दोन जणांना मतदारांना पैशांची पाकिटे वाटताना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला आहे. या दोघांना भरारी पथकाच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिस पुढील कारवाई करत आहेत. हे पैसे भाजपच्या उमेदवाराकडून वाटले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या सर्व घटनांमुळे अंबरनाथमधील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande