
सोलापूर, 20 डिसेंबर, (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७५ शाळा आहेत. त्यात सुमारे १५० शाळांची पटसंख्या १० ते २० पेक्षा कमी आहे. आता नव्या शासन निर्णयानुसार संचमान्यता झाल्यानंतर पहिल्यांदाच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल. शासन निर्णयाप्रमाणे ८० टक्केच पदभरती करता येते. सध्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ९४ टक्के पदे भरलेली आहेत. त्यामुळे नव्या शिक्षक भरतीत सोलापूर जिल्हा परिषदेला नवीन एकही शिक्षक मिळणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
२०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षात राज्यातील जिल्हा परिषदांच्या १८ हजार ६०० शाळांची पटसंख्या १ ते २० पर्यंत होती. पण, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील संचमान्यतेनुसार २० पेक्षा कमी पटाच्या शाळांची संख्या २५ हजारांपर्यंत पोचली. त्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या १५० हून अधिक शाळा आहेत. १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयानुसार १० पेक्षा कमी पटाच्या शाळेवर प्रत्येकी एक नियमित तर २० पेक्षा कमी पटाच्या शाळांवर प्रत्येकी दोन नियमित शिक्षक अपेक्षित आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड