
लातूर, 20 डिसेंबर, (हिं.स.)। वेळ –अमावस्या हा लातूर जिल्ह्याचा एक आगळा-वेगळा, मातीशी नाळ जोडणारा आणि जगावेगळा लोकोत्सव आहे. घरं बंद, शिवार फुल्ल अशी अवस्था या दिवशी दिसून येते. जवळपास सर्व लातूरकर आपल्या शेतामध्ये उपस्थित असतात. सर्व भाविक यांचे उभ्या पिकात साजरा होणारा सण, अमावास्येलाच शुभ मानणारी परंपरा, शेतकऱ्यासाठी काळ्या आईचा उत्सव आणि आंबील-भज्जीसारख्या औषधी वनभोजनाची मेजवानी – अशी ही अनोखी परंपरा आहे.
या आगळ्या-वेगळ्या परंपरेनुसार लातूर शहर व परिसरातील नागरिक मोठ्या श्रद्धा व उत्साहात शेतामध्ये जाऊन काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी मनोभावे पूजा करतात व कुटुंबीयांसह वनभोजनाचा आनंद घेतात. हा सण लातूर जिल्ह्यासह धाराशिव, सोलापूर व बीड जिल्ह्याच्या काही भागातही साजरा केला जातो.
सदर सणानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणावर दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांद्वारे शेताकडे जातात व संध्याकाळी एकाच वेळी शहराकडे परततात. परिणामी मागील काही वर्षांमध्ये लातूर शहरातील प्रमुख चौक व नाक्यांवर तासन्तास वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत होता. तसेच घरे रिकामी असल्याने चोरीच्या घटनाही घडत होत्या.
ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक, लातूर मा. अमोल तांबे यांनी वेळ –अमावस्या सणाच्या पार्श्वभूमीवर पूर्वनियोजन करून वाहतूक कोंडी व घरफोडी आणि चोरीच्या घटना टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता विशेष व प्रभावी उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले.
त्या अनुषंगाने शेताकडून शहरात आणि ग्रामीण भागातून परतणाऱ्या वाहनांच्या सुरळीत वाहतुकीसाठी नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले. शहरातील प्रमुख चौक, नाके व संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक पोलीस, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, चौक बंदोबस्त व सतत पेट्रोलिंग ठेवण्यात आली होती.
मुख्यत्वे गरुड चौक, बाभळगाव नाका, बसवेश्वर चौक, कनेरी चौक, राजीव गांधी चौक, छत्रपती चौक, पीव्हीआर चौक, जुना रेणापूर नाका तसेच इतर आवश्यक ठिकाणी पो नी दराडे वाहतूक शाखा लातूर व अमलदारांची तैनाती करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी कुठेही वाहतूक कोंडी न होता अतिशय जलद व सुरळीतरीत्या वाहनांची ये-जा पार पडली आणि नागरिक सुखरूपपणे आपापल्या घरी पोहोचले.
त्याचप्रमाणे चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सराईत व संशयित गुन्हेगारांवर विशेष नजर ठेवण्यात आली होती. मोठ्या प्रमाणावर पेट्रोलिंग, साध्या वेशातील पोलिसांची गस्त तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडून मोटारसायकल व जीपद्वारे अतिरिक्त पेट्रोलिंग करण्यात आले. परिणामी संपूर्ण लातूर शहरात एकाही चोरीच्या घटनेची नोंद झाली नाही, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
ही संपूर्ण वाहतूक व्यवस्था व कायदा-सुव्यवस्था पोलीस अधीक्षक मा. अमोल तांबे यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक मा. मंगेश चव्हाण यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली राबविण्यात आली. यामध्ये वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी अधिकारी पो नी दराडे व अमलदार तसेच पोलीस ठाणे लातूर ग्रामीण, एमआयडीसी व विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमलदार यांनी अत्यंत चोखपणे व जबाबदारीने कर्तव्य बजावले.
सदर वाहतूक व्यवस्थेसाठी पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे ०३ पोलीस अधिकारी व ३५ पोलीस अमलदार, तसेच संबंधित पोलीस ठाण्यांचे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली ०४ अधिकारी व २५ पोलीस अमलदारांनी पेट्रोलिंग व गस्त प्रभावीपणे पार पाडली.
सर्व अधिकारी व अमलदारांनी उत्कृष्ट समन्वय साधत काम केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार, अपघात, वाहतूक कोंडी अथवा चोरीची घटना न होता वेळा–अमावस्या सण शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडला.
लातूर जिल्हा पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असून, नागरिकांनी नियमांचे पालन करून दिलेल्या सहकार्याबद्दल लातूर जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis