
एअर इंडियाने वैमानिकाला ड्युटीवरून हटवले
नवी दिल्ली, 20 डिसेंबर (हिं.स.) । दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 वर एका प्रवाशासोबत कथित मारहाणीची घटना समोर आली आहे. संबंधित प्रवाशाने एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका पायलटवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. घटनेच्या वेळी आपण कुटुंबीय आणि लहान मुलासोबत प्रवास करत होतो, असा दावा पीडित प्रवाशाने केला आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर एअर इंडिया एक्सप्रेसने संबंधित पायलटला तात्काळ प्रभावाने ड्युटीवरून दूर केले आहे.
दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 वर एअर इंडिया एक्सप्रेसच्या पायलटविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अंकित दिवाण नावाच्या प्रवाशाने असा दावा केला आहे की पायलट कॅप्टन वीरेंद्र यांनी केवळ गैरवर्तनच केले नाही, तर त्यांच्यावर हल्लाही केला, ज्यात ते जखमी झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि छायाचित्रांनंतर या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. पीडित प्रवाशाचे म्हणणे आहे की या घटनेमुळे त्यांची संपूर्ण सुट्टी उध्वस्त झाली असून, त्यांचे कुटुंब, विशेषतः त्यांची 7 वर्षांची मुलगी अजूनही मानसिक धक्क्यात आहे. प्रवाशाचा दावा आहे की आपल्या 7 वर्षांच्या मुलीसमोरच आपल्याला मारहाण करण्यात आली, ज्यामुळे ती अजूनही घाबरलेली आणि धक्क्यात आहे. या घटनेनंतर एअर इंडिया एक्सप्रेसने निवेदन जारी करत खेद व्यक्त केला असून, आरोपी पायलटला तात्काळ ड्युटीवरून हटवण्यात आले आहे.
प्रवाशाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, सुरक्षा तपासणीसाठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला स्टाफसाठी असलेल्या रांगेत जाण्यास सांगण्यात आले, कारण त्यांच्या सोबत 4 महिन्यांचे बाळ स्ट्रोलरमध्ये होते. त्यांच्या पुढे स्टाफ रांग तोडत होता. यावर आक्षेप घेतल्यानंतर कॅप्टन वीरेंद्र संतप्त झाले आणि त्यांनी अपमानास्पद भाषा वापरली. त्यानंतर वाद वाढला आणि पायलटने त्यांच्यावर हल्ला केला, ज्यामुळे त्यांना दुखापत होऊन रक्तस्राव झाला. पायलटच्या शर्टवर लागलेले रक्त हे आपलेच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या घटनेमुळे त्यांची सुट्टी पूर्णपणे खराब झाली असून, त्यांच्या मुलीने आपल्या वडिलांवर होत असलेली मारहाण पाहिल्याने ती मानसिक धक्क्यात आहे.
या प्रकरणानंतर एअर इंडिया एक्सप्रेसने पायलटच्या वर्तनाबद्दल खेद व्यक्त करत अधिकृत निवेदन जारी केले आहे. कंपनीने स्पष्ट केले की संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ प्रभावाने सर्व अधिकृत जबाबदाऱ्यांपासून दूर करण्यात आले असून, घटनेची चौकशी सुरू आहे.कंपनीच्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली विमानतळावर घडलेल्या घटनेची आम्हाला माहिती मिळाली आहे, ज्यामध्ये आमचा एक कर्मचारी सहभागी होता. संबंधित कर्मचारी दुसऱ्या विमानसेवेच्या फ्लाइटने प्रवासी म्हणून प्रवास करत होता आणि त्याचा एका अन्य प्रवाशाशी वाद झाला. अशा प्रकारच्या वर्तनाचा आम्ही तीव्र निषेध करतो. संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ प्रभावाने ड्युटीवरून हटवण्यात आले असून, प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. चौकशीच्या निष्कर्षांनुसार योग्य शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. एअर इंडिया एक्सप्रेस आपल्या कर्मचाऱ्यांकडून शिस्तबद्ध आणि व्यावसायिक वर्तनाची अपेक्षा ठेवते, तसेच प्रत्येक प्रसंगी जबाबदारीने वागण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे कंपनीने नमूद केले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी