


नवी दिल्ली, 23 डिसेंबर (हिं.स.)। 'जन भागिदारी' हा लोककेंद्रित सुरक्षेचा कणा आहे असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. राष्ट्रपतींनी नवी दिल्ली येथे ‘लोककेंद्रित राष्ट्रीय सुरक्षा: विकसित भारताच्या उभारणीत सामुदायिक सहभाग’ या विषयावरील आयबी सेंटेनरी एंडॉवमेंट लेक्चर कार्यक्रमाला संबोधित केले.
या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, स्वातंत्र्यानंतर भारतातील लोकांना सुरक्षा प्रदान करण्यात आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनिश्चित करण्यात गुप्तचर विभाग उत्कृष्ट भूमिका बजावत आहे, ही अभिमानाची बाब आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की, या व्याख्यानाची 'लोककेंद्रित राष्ट्रीय सुरक्षा: विकसित भारताच्या उभारणीत समुदायाचा सहभाग' ही संकल्पना आपल्या देशासाठी तात्कालिक आणि दीर्घकालीन दोन्ही दृष्टीने महत्त्वाची आहे. गुप्तचर विभागासह सर्व संबंधित संस्थांनी राष्ट्रीय सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे याबाबत आपल्या लोकांमध्ये जागरूकता पसरवावी. समुदायाचा सहभाग राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करतो. लोकांनी त्यांच्या स्वतःच्या परिसराच्या तसेच त्यापलीकडील प्रदेशांच्या सुरक्षेबाबत सतर्क आणि सक्रिय भागीदार बनले पाहिजे असे राष्ट्रपती म्हणाल्या.
राष्ट्रपती म्हणाल्या की, आपले नागरी पोलिस आणि अंतर्गत सुरक्षा संस्थांनी जनतेची सेवा करण्याच्या भावनेने काम करायला हवे. भारताला बहुआयामी सुरक्षा आव्हाने आणि धोक्यांचा सामना करावा लागत आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. सीमावर्ती भागात तणाव, दहशतवाद आणि अतिरेकी, बंडखोरी आणि सांप्रदायिक कट्टरतावाद हे सुरक्षा चिंतेचे पारंपारिक विषय आहेत. देशाच्या कोणत्याही भागात सुरक्षेचा अभाव हा प्रभावित क्षेत्राच्या पलीकडे जाऊन आर्थिक परिणाम करतो यावर त्यांनी भर दिला. सुरक्षा हा आर्थिक गुंतवणूक आणि विकासाच्या प्रमुख घटकांपैकी एक आहे. 'समृद्ध भारत' च्या निर्मितीसाठी 'सुरक्षित भारत' उभारणे आवश्यक आहे.
राष्ट्रपतींनी नमूद केले की नक्षलवादाचे पूर्णपणे उच्चाटन होण्याच्या जवळ आपण पोहचलो आहोत.
सोशल मीडियाने माहिती आणि संवादाचे जग बदलून टाकले आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. त्यात सर्जनशीलता आणि विनाश दोन्हीची क्षमता आहे. चुकीच्या माहितीपासून लोकांचे संरक्षण करणे हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. हे काम सातत्याने आणि अतिशय प्रभावीपणे पार पाडले पाहिजे. राष्ट्रीय हितासाठी तथ्यांवर आधारित माहिती सातत्याने सादर करणाऱ्या सक्रिय सोशल मीडिया वापरकर्त्यांचा समुदाय तयार करण्याची गरज आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की राष्ट्रीय सुरक्षेसमोरील सर्वात जटिल आव्हाने अपारंपारिक आणि डिजिटल स्वरूपाची आहेत. यापैकी बहुतेक समस्या अत्याधुनिक तंत्रज्ञानातून उद्भवतात. या संदर्भात, तंत्रज्ञान -दृष्ट्या सक्षम समुदाय विकसित करण्याची गरज आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की नागरिक कल्याण आणि सार्वजनिक सहभागाला आपल्या धोरणाच्या केंद्रस्थानी ठेवून, आपण आपल्या नागरिकांना बुद्धिमत्ता आणि सुरक्षेचा प्रभावी स्रोत बनण्यास सक्षम करू शकतो. सार्वजनिक सहभागाद्वारे आपण सर्वजण जागरूक, शांततापूर्ण, सुरक्षित आणि समृद्ध भारताच्या निर्मितीच्या दिशेने वेगाने वाटचाल करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule