
मुंबई, 23 डिसेंबर (हिं.स.)। पोको इंडियाने आपल्या नव्या एम सिरीज स्मार्टफोनच्या लाँचचा अधिकृत टीझर नुकताच जारी केला असून, कंपनीने अद्याप फोनचे नाव किंवा डिझाइन अधिकृतपणे उघड केलेले नाही. मात्र, लीक आणि विविध सर्टिफिकेशन लिस्टिंग्सनुसार ही आगामी सिरीज पोको एम8 आणि पोको एम8 प्रो अशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे दोन्ही स्मार्टफोन भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये लाँच होणार असून, जानेवारी 2026 मध्ये ते उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
लीक रिपोर्ट्सनुसार, पोको एम8 सिरीज ही रेडमी नोट 15 सिरीजवर आधारित असेल. अनेक अहवालांनुसार पोको एम8 हा रेडमी नोट 15 5G चा, तर पोको M8 प्रो हा रेडमी नोट 15 प्रो+ चा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो. मात्र, वेगवेगळ्या बाजारांसाठी हार्डवेअरमध्ये काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, भारतीय व्हेरिएंटमध्ये पोको M8 प्रोला 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो, जो चायनीज रेडमी नोट 15 प्रो+ सारखाच असेल. तर ग्लोबल व्हर्जनमध्ये 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा सेन्सर देण्यात येण्याची शक्यता आहे.
स्पेसिफिकेशन्सबाबत बोलायचे झाल्यास, पोको एम8 प्रोमध्ये 6.83 इंचाचा 1.5K ओएलईडी डिस्प्ले, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, स्नॅपड्रॅगन 7s जन 4 चिपसेट आणि 6500mAh क्षमतेची बॅटरी असण्याची शक्यता आहे. यासोबतच 100 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळण्याचीही अपेक्षा आहे. दुसरीकडे, पोको एम8 मध्ये स्नॅपड्रॅगन 6 जन 3 चिपसेट आणि 5520mAh बॅटरी दिली जाऊ शकते.
ऑनलाइन लीक झालेल्या रेंडर्सनुसार, पोको एम8 आणि एम8 प्रो हे दोन्ही फोन काळा, निळा आणि सिल्व्हर-काळ्या ड्युअल-टोन रंगांमध्ये येऊ शकतात. फोनच्या मागील बाजूला खालच्या उजव्या कोपऱ्यात पोको ब्रँडिंग दिसेल. स्क्वेअर आकाराच्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये तीन कॅमेरे असतील. समोरच्या बाजूला होल-पंच सेल्फी कॅमेरा आणि तुलनेने जाड बेझेल्स दिसतात. उजव्या बाजूला पॉवर आणि व्हॉल्यूम बटन्स असतील, तर खालच्या बाजूला यूएसबी टाइप-सी पोर्ट, स्पीकर आणि मायक्रोफोन देण्यात येईल.
सर्टिफिकेशनबाबत पाहिले असता, पोको एम8 प्रोला टीडीआरए (यूएई), एफसीसी, आयएमडीए आणि आयएमईआय डेटाबेसमध्ये स्पॉट करण्यात आले आहे. तर पोको एम8 5G ला भारतातील बीआयएससह एनबीटीसी, आयएमडीए आणि टीडीआरए सर्टिफिकेशन मिळाले आहे. यामुळे या सिरीजचा लाँच जवळ आल्याचे संकेत मिळत आहेत.
पोकोची एम सिरीज नेहमीच बजेट सेगमेंटमध्ये लोकप्रिय राहिली असून, आगामी पोको एम8 सिरीज आकर्षक डिझाइन आणि दमदार फीचर्ससह मिड-रेंज स्मार्टफोन मार्केटमध्ये स्पर्धा अधिक तीव्र करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule