बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर विश्व हिंदू परिषदेचं निदर्शने
नवी दिल्ली, 23 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या आणि हिंदू युवक दीपु चंद्र दास यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायोगाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदू संघ
बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर विश्व हिंदू परिषदेचं निदर्शने


नवी दिल्ली, 23 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या आणि हिंदू युवक दीपु चंद्र दास यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायोगाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदू संघटनांच्या वतीने हे आंदोलन केले जात असून, परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज बांगलादेशमधील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना बोलावले आहे.

विश्व हिंदू परिषदेने बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हिंसा व अत्याचारांच्या निषेधार्थ आज सकाळी ११ वाजल्यापासून बांगलादेश उच्चायोगाबाहेर शांततामय आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र, उच्चायोगाबाहेरचे आंदोलन उग्र झाले आहे. पोलिस आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असून, आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याचेही दिसून आले आहे. बांगलादेश उच्चायोगाबाहेर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते एकत्र जमून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी करत आहेत. बांगलादेशच्या मयमनसिंह जिल्ह्यात २७ वर्षीय हिंदू युवक दीपु चंद्र दास यांची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपु चंद्र दास यांच्यावर कथित ईशनिंदेचा आरोप करत जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. आरोपानुसार, आधी त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर मृतदेहाशी अमानुष वर्तन करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण देशात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांविरोधात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या आणि हिंदू युवकाच्या मॉब लिंचिंगच्या घटनेविरोधात देशभरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, सुरत, पटना यांसह देशातील अनेक शहरांमध्ये लोक बांगलादेशच्या अंतरिम सरकारविरोधात आंदोलन करत असून मोहम्मद युनूस यांचा पुतळा जाळत आहेत. दरम्यान, बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी बांगलादेशमधील भारतीय उच्चायुक्तांना समन्स पाठवले आहे. नवी दिल्लीतील बांगलादेशी उच्चायोगाबाहेर झालेल्या कथित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे समन्स जारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande