
अमरावती, 24 डिसेंबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये आठ स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार महिला नगराध्यक्षांच्या हाती आला आहे. उर्वरित चार ठिकाणी पुरुष नगराध्यक्ष शहराचा कारभार सांभाळतील.शेंदुरजनाघाट, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे, दर्यापूर, अचलपूर आणि मोर्शी या सात नगरपालिका, तसेच नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीमध्ये महिला नगराध्यक्षा निवडून आल्या आहेत. याउलट, धारणी नगरपंचायत, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा आणि वरुड नगरपालिकांमध्ये पुरुष नगराध्यक्षांनी विजय मिळवला आहे.
महिला नगराध्यक्षांमध्ये शेंदुरजनाघाट येथे भाजपच्या सुवर्णा वरखडे, चांदूर रेल्वेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका विश्वकर्मा, चांदूर बाजारमध्ये प्रहारच्या मनीषा नांगलिया, धामणगाव रेल्वेमध्ये भाजपच्या अर्चना रोठे, दर्यापूरमध्ये काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाकळे, अचलपूरमध्ये भाजपच्या रुपाली माथने, मोर्शीमध्ये शिंदे सेनेच्या प्रतीक्षा गुल्हाने आणि नांदगाव खंडेश्वरमध्ये शिवसेनेच्या (उबाठा) प्राप्ती मारोटकर यांचा समावेश आहे. नागरिकांनी त्यांना आपापल्या शहराचा कारभार चालवण्याची संधी दिली आहे.पुरुष नगराध्यक्षांमध्ये चिखलदरा येथे काँग्रेसचे शेख अब्दुल, वरुड येथे भाजपचे ईश्वर सलामे, अंजनगाव सुर्जीमध्ये भाजपचे अविनाश गायगोले आणि धारणी नगरपंचायतीमध्ये भाजपचे सुनील चौथमल यांनी विजय मिळवला आहे. आगामी पाच वर्षांसाठी या शहरांची सत्ता त्यांच्या हातात राहील.
दरम्यान, काही नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष ज्या पक्षाचे आहेत, त्या पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणता आलेले नाहीत. यामुळे त्यांना कारभार चालवताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. त्यामुळे एकूण १२ जागांपैकी निम्म्या जागा महिलांना मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात त्याहून अधिक महिला निवडून आल्या आहेत. विशेषतः दर्यापूर येथील नगराध्यक्षपद सर्वांसाठी खुले होते. या जागेसाठी पुरुष आणि महिला दोघांनीही प्रयत्न केले, परंतु पुरुषांना मागे टाकत एका महिलेने विजय मिळवला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी