
रायगड, 24 डिसेंबर (हिं.स.)। अनुभव, शौर्य आणि उत्कृष्ट तपास कौशल्य यांचा संगम असलेले पोलीस उपनिरीक्षक राहुल रघुनाथ वरोटे यांनी नेरळ पोलीस ठाण्यात पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळावली आहे. मुळगाव कोल्हापूर असलेले राहुल वरोटे हे सन २०११ मध्ये पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून सेवेत दाखल झाले असून, त्यांचा आतापर्यंतचा एकूण सेवाकाळ तब्बल १५ वर्षांचा आहे.
वरोटे यांनी आपल्या सेवाकाळात गोंदिया, पुणे ग्रामीण, सातारा, सिंधुदुर्ग आणि कर्जत अशा विविध जिल्ह्यांत जबाबदारी सांभाळली आहे. वेगवेगळ्या भौगोलिक व सामाजिक परिस्थितीत काम करताना त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असून, आतापर्यंत त्यांना १०१ रिवॉर्ड मिळाले आहेत, हे त्यांच्या कार्यक्षमतेचे मोठे द्योतक मानले जाते.
कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणात त्यांनी एसआयटी (विशेष तपास पथक) अंतर्गत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. तसेच सन २०२३ मध्ये घडलेल्या पुणे हायवे मर्डर प्रकरणात त्यांनी केलेल्या प्रभावी तपासामुळे सीआयडी पुणे बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड प्राप्त केला आहे. नक्षलग्रस्त भागात अडीच वर्षे खडतर सेवा बजावत त्यांनी धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडवले असून, या सेवेसाठी त्यांना विशेष पदकाने गौरवण्यात आले आहे.
प्रभारी अधिकारी म्हणून यापूर्वी त्यांनी तळबीड (ता. कराड, जि. सातारा) येथे जबाबदारी सांभाळली आहे. तसेच कराड शहर वाहतूक विभाग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस पोलीस ठाण्यातही त्यांनी उल्लेखनीय काम केले. कर्जत तालुक्यात २१ लाख रुपयांच्या चोरीचा गुन्हा फास्ट ट्रॅक तपासातून उघडकीस आणणे, तसेच अज्ञात इसमाने पळवून नेलेली इनोवा कार शोधून काढणे या कारवायांमुळे त्यांचे नाव कर्जत तालुक्यात विशेष लौकिकास आले. अशा अनुभवी, धडाडीच्या आणि पुरस्कारप्राप्त अधिकाऱ्याने नेरळ येथे पदभार स्वीकारल्याने गुन्हेगारीवर कडक नियंत्रण राहील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके