
बीड, 24 डिसेंबर (हिं.स.)। राज्यातील शेतकरी सध्या अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून जात असून शेतीमालाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झालेली असताना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. विशेषतः कापूस, सोयाबीन व तूर या प्रमुख पिकांचे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी हक्क मोर्चा काढण्यात येणार असल्याचे समितीचे शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, माजी सैनिक अशोक येडे, कुलदीप करपे डॉ. गणेश ढवळे, गणेश मस्के, सुहास जायभाय, अर्जुन सोनवणे, राजू गायके, अण्णासाहेब राऊत यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत शेतकऱ्यांच्या कापसाला किमान १२०००/- प्रति क्विंटल भाव देण्यात यावा. सोयाबीनसाठी किमान ७००० प्रति क्विंटल दर निश्चित करण्यात यावा. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (उउख) कडून होणारी अडवणूक थांबवून सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात यावा. हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या बाजार समित्या व व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. बाजारात कमी दराने खरेदी झालेल्या शेतमालाचा विक्रीदर व खरेदीदरातील फरक सरकारने अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना भरून द्यावा.
शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, सबसिडी, ठिबक, तुषार सिंचन अनुदान व पीक विमा यांची थकीत रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. या मागण्यांकडे शासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास शेतकऱ्यांमध्ये तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. शेतकरी हक्क मोर्चाला जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis