
बीड, 24 डिसेंबर (हिं.स.)। गेवराई तालुक्यातील गढी येथे ६ वर्षांच्या चिमुकलीला तिचीच आई रोज मारहाण करत होती. तिला रस्त्यावर भीक मागायला लावत होती. ही माहिती संवेदनशील नागरिकांनी जिल्हा चाईल्ड हेल्पलाईनच्या १०९८ क्रमांकावर मिळाल्यानंतर कारवाई करीत या चिमुकलीला बालगृहात पाठवण्यात आले आहे.
चाईल्ड हेल्पलाईनच्या पथकाने कारवाई केली. चिमुकलीला आता सहारा अनाथाश्रमात रवाना केले आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज ससे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मंगेश जाधव, जिल्हा प्रकल्प समन्वयक अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी भेट दिली असता चिमुकली दिवसा आणि रात्री रस्त्यावर भीक मागत होती. शिवाय उघड्यावर झोपत होती. तसेच तिला आईकडून सतत मारहाण होत होती.
चाईल्ड हेल्पलाईनने बालिकेच्या प्रकाराबाबत गेवराई पोलीस स्टेशनला माहिती दिली. आईचे समुपदेशन केले. बालगृहात प्रवेशाची प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर बालिकेला बीडच्या बाल कल्याण समितीसमोर सादर केले. समुपदेशन करून बालिकेला बालगृहात ठेवण्याचा निर्णय घेतला. बालिकेला गेवराई येथील सहारा अनाथाश्रम येथे दाखल करण्यात आले.
-------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis