
बीड, 24 डिसेंबर (हिं.स.)। लातूर कल्याण द्रुतगती मार्गाच्या आराखड्यात बदल करून बीड जिल्ह्याला डावलण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने झाली. बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने आंदोलन झाले.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. आराखड्यात बदल झाला, तर प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत लक्ष्यवेधी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
या मार्गाचा मूळ आराखडा लातूर अंबेजोगाई केज बीड जामखेड अहिल्यानगर कल्याण असा आहे. मात्र, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी लातूर - कळंब-पारा ईट खर्डा जामखेड अहिल्यानगर - कल्याण असा पर्यायी मार्ग सुचवून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर केला आहे. या प्रस्तावामुळे बीड जिल्ह्याचा विकास थांबेल, असा आरोप आंदोलकांनी केला.
या महामार्गामुळे बीड जिल्ह्यात उद्योग, रोजगार, कृषी व पूरक व्यवसायांना चालना मिळणार होती. शेतकऱ्यांचे उत्पादन मुंबई-ठाणेपर्यंत जलद पोहोचले असते. त्यामुळे बीड जिल्ह्याला वगळणे अन्यायकारक ठरेल, असे आंदोलक म्हणाले.
या आंदोलनात शेख युनूस, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, माजी सैनिक अशोक येड, राजेंद्र आमटे, कुलदीप करपे, गणेश मस्के आर्दीचा सहभाग होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis