शिवाजी ढवळे यांची नेरळहून खोपोली येथे बदली
रायगड, 24 डिसेंबर (हिं.स.)। गुन्हेगारांसाठी धडकी भरवणारे नाव आणि नागरिकांसाठी विश्वासाचा आधार ठरलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी अजिनाथ ढवळे यांचा नेरळ पोलीस ठाण्यातील कार्यकाळ आज संपला. ४ ऑगस्ट २०२३ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रभारी अधिकारी
घरफोडी, चोरी, खून अन् ड्रग्सवर घाव; नेरळचे ‘सुपरकॉप’ शिवाजी ढवळे खोपोलीकडे रवाना


रायगड, 24 डिसेंबर (हिं.स.)। गुन्हेगारांसाठी धडकी भरवणारे नाव आणि नागरिकांसाठी विश्वासाचा आधार ठरलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी अजिनाथ ढवळे यांचा नेरळ पोलीस ठाण्यातील कार्यकाळ आज संपला. ४ ऑगस्ट २०२३ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रभारी अधिकारी म्हणून त्यांनी नेरळ परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा कणखर पहारा दिला. आज दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी त्यांची बदली खोपोली पोलीस ठाण्यात झाली.

नेरळमध्ये कार्यरत असताना ढवळे यांनी गुन्हेगारीला अक्षरशः चेकमेट दिले. सन २०२३ मध्ये १३ घरफोडी आणि २१ चोरांचा पर्दाफाश करत त्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. २०२४ हे वर्ष तर त्यांच्या धडाकेबाज कामगिरीचे ठळक उदाहरण ठरले. या काळात २२ चोऱ्या, १४ घरफोडी आणि एका खुनाच्या गुन्ह्याचा त्यांनी यशस्वी उलगडा करून पोलीस खात्याची कार्यक्षमता सिद्ध केली.

सन २०२५ मध्येही त्यांच्या तपास यंत्रणेचा वेग कायम राहिला. १२ चोरी, ८ घरफोडी, एक खून आणि एका फायरिंग प्रकरणाचा उलगडा करत त्यांनी गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का दिला. याशिवाय एमडी ड्रग्स पकड प्रकरणात त्यांनी केलेली कारवाई विशेष चर्चेचा विषय ठरली. अमली पदार्थांच्या साखळीवर प्रहार करत त्यांनी तरुण पिढीला वाचवण्याचा प्रयत्न केला. गोरक्षक म्हणूनही त्यांनी कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर भूमिका घेत आदर्श कामगिरी बजावली.

ढवळे यांच्या तपास कौशल्याची चुणूक दाखवणारी कामगिरी म्हणजे सन २००१ मधील खुनाच्या प्रकरणातील बेनावे असलेला आरोपी त्यांनी शोधून काढला, तसेच २००८ मधील फसवणुकीच्या दोन आरोपींनाही अटक केली. जुने गुन्हे उकरून काढत न्याय मिळवून देणे हेच त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य राहिले.

नेरळ पोलीस ठाण्यातील त्यांचा कार्यकाळ गुन्हेगारांसाठी भीतीचा आणि नागरिकांसाठी दिलास्याचा ठरला. आता खोपोलीतही त्यांच्या धडाकेबाज कारवाईची उत्सुकतेने प्रतीक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande