
लातूर, 24 डिसेंबर (हिं.स.)दरवर्षीप्रमाणे यंदाही कुरळा ते बसवकल्याण समता संदेश पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.ही पदयात्रा ५ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.
या पदयात्रेचे नेतृत्व समतावादी विचारांचे प्रखर प्रवर्तक करीत असून, वारकरी संप्रदायाचे अभ्यासक महाराजांनी शरण आलेल्या पिढीला त्यांच्या आत्मसन्मानाची व - स्वाभिमानाची जाणीव करून देण्यावर भर दिला आहे. गुरु-तत्त्व, समतेचा विचार आणि मानवतावादी मूल्ये या पदयात्रेचा गाभा आहेत.या समता संदेश पदयात्रेदरम्यान विविध गावांमध्ये प्रबोधनपर भाषणे, विचारमंथन आणि सामाजिक संवाद आयोजित करण्यात येत आहेत. या पदयात्रेमुळे तरुण पिढीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत बसवेश्वर आणि महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा निर्माण होत आहे.
ही पदयात्रा कुरळा, जळकोट, औसा, निलंगा, उमरगा, तुळजापूर, सोलापूर यांसह विविध मार्गांनी प्रवास करीत अखेरीस बसवकल्याण येथे समारोप होणार आहे.
समाजात वाढत चाललेल्या विषमतेला विरोध करत समताधिष्ठित समाजरचनेचा आग्रह ही पदयात्रा अधिक ठळकपणे मांडत आहे. समाज परिवर्तनाच्या लढ्यात समता संदेश पदयात्रा ही केवळ चाल नाही, तर विचारांची चळवळ आहे, असे या पदयात्रेचे महत्व आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis