
पुणे, 24 डिसेंबर (हिं.स.)। कोणाची आयुष्याच्या प्रवासात नाती दूरावली, तर कोणी परिस्थितीच्या ओघात एकाकी पडलेला… कोणाच्या नात्यांची ऊब हरवलेली, तर कोणाचा ओळखींचा आधार तुटलेला... समाजातील अशा निराधारांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने रिअल लाईफ रिअल पीपल या संस्थेच्या सहकार्याने चालवण्यात येणाऱ्या “सावली निवारा केंद्रा”मध्ये मायेच्या छायेखाली पुन्हा जगण्याची उमेद फुलू लागली आहे. येथे निवारा मिळतोच; पण त्याहून अधिक मिळते ते माणूस म्हणून स्वीकारले जाण्याचं समाधान. याच सावलीत आज या निराधारांनी येत्या १५ जानेवारी २०२५ रोजी पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्याचा ठाम निर्धार केला आहे. यासर्वांनी आज मतदानाची शपथ देखील घेतली. यावेळी आपलं मत म्हणजे केवळ अधिकार नाही, तर समाजाशी पुन्हा जोडले जाण्याची ओळख आहे, ही जाणीव त्यांच्या चेहऱ्यावर दिसली.
पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मा. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली असून, या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली महापालिका हद्दीत स्वीप अंतर्गत व्यापक मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आज सावली निवारा केंद्रामध्ये मतदानाची शपथ व मतदान जनजागृती पथनाट्य सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु