
अमरावती, 24 डिसेंबर (हिं.स.)। रेशन दुकानदारांच्या संगनमताने नियतनापेक्षा सुमारे दोन हजार क्विंटल अधिक रेशन धान्य मंजूर करून त्याची अफरातफर केल्याचा गंभीर प्रकार अमरावती तहसील ग्रामीणमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित महिला निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांना जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे.
पुरवठा विभागाकडून लाभार्थी संख्या व प्रवर्गानुसार रेशन दुकानदारांना धान्याचे वितरण केले जाते. मात्र माहुली जहांगीर व औरंगपूर येथील रेशन दुकानदारांना मंजूर नियतन यादी व गोदाम नोंदवहीमध्ये मोठी तफावत आढळून आली. जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी ही बाब गंभीरतेने घेत एईपीडीएस पोर्टलवरील माहिती व की रजिस्टरच्या आधारे पडताळणी केली असता अतिरिक्त धान्य मंजुरीचा घोळ निदर्शनास आला.
तपासणीत अंत्योदय व प्राधान्य प्रवर्गातील रेशन दुकानदारांना मंजूर प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात गहू व तांदूळ वितरित झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एडीएसओ प्रज्वल पाथरे यांच्या नेतृत्वाखाली पथक गठित करण्यात आले. पथकाच्या तपासणीत निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांच्याकडून दुकाननिहाय धान्य नियतनात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाले.
ही बाब जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांच्या मान्यतेने २३ डिसेंबर रोजी संबंधित निरीक्षण अधिकाऱ्यास नोटीस बजावण्यात आली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ठराविक रेशन दुकानदारांना देय नियतनापेक्षा जास्त धान्य मंजूर केल्याबाबत समक्ष उपस्थित राहून प्रमाणित कागदपत्रांसह लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी