शिवराज पाटील चाकुरकर यांना लातूरकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
लातूर, 24 डिसेंबर (हिं.स.)।सभ्यतेचे, नैतिकतेचे आणि तत्वनिष्ठतेचे दीपस्तंभ असलेले देशाच्या लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकुरकर यांना एका कार्यक्रमात लातूरकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजली सभेत असंख्य मान्यवरांन
शिवराज पाटील चाकुरकर यांना लातूरकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली


लातूर, 24 डिसेंबर (हिं.स.)।सभ्यतेचे, नैतिकतेचे आणि तत्वनिष्ठतेचे दीपस्तंभ असलेले देशाच्या लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकुरकर यांना एका कार्यक्रमात लातूरकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजली सभेत असंख्य मान्यवरांनी शिवराज पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.

शहरातील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या श्रद्धांजली सभेस पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे, माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, अष्टविनायक प्रतिष्ठानचे संस्थापक प्रदीप राठी, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदीनाथ सांगवे, अ‍ॅड. धनंजय पाटील, प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, राजेश्वर बुके, माजी कुलगुरु अशोक ढवण, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे यांच्यासह शैलेश पाटील चाकूरकर, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, रुद्राली पाटील, ऋषिका पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शिवराज पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करताना डॉ. अशोक कुकडे म्हणाले, ६० वर्षांपेक्षा अधिक काळ आमची मैत्री होती. विचारधारा वेगवेगळी असली तरी आमच्या मैत्रीत कधी अंतर पडले नाही. आम्ही वारंवार भेटत असू. या भेटीत राजकारणापेक्षा अधिक आध्यात्म, विज्ञान, गीता, दासबोध या ग्रंथांवर चर्चा व्हायची. एक वेगळा राजकीय नेता आपल्यातून गेल्याचे दु:ख आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. जनार्दन वाघमारे यांनी एक उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. मित्र म्हणून खूप काळ आम्ही एकत्र रोहिलो. प्रतिभाशाली, खरे तर ते उत्तुंग नेतृत्व पण त्यांनी गर्व कधी केला नाही, अशा शब्दात श्रद्धांजली अर्पण केली. लक्ष्मीरमण लाहोटी यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांचे जीवनकार्य अनुकरणीय असल्याचे म्हटले. प्रदीप राठी यांनी शिवराज पाटील चाकूरकर मोठे नेतृत्व होते. आता ते लुप्त झाले आहेत. त्यांनी कधीही नकारात्मक दृष्टिकोन बाळगला नाही, अशा शब्दात श्रद्धांजली अर्पण केली.

खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने आपण सर्वांनीच एक उत्तुंग नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त केली तर आदीनाथ सांगवे यांनी शिवराज पाटील चाकूरकर सरलता, नैतिकता आणि नितीमूल्यांना कृतीत उतरवणारे नेते होते. त्यांच्या जाण्याने देशाचे नुकसान झाले, अशा शब्दात श्रद्धांजली अर्पण केली. समस्त लातूरकरांच्या वतीने आयोजित या श्रद्धांजली सभेस लातूर शहर व परिसरातील असंख्य मान्यवर नागरिकांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande