





मुंबई, 24 डिसेंबर (हिं.स.)२०२५ मध्ये भारतीय फुटबॉलने सर्वात अशांत आणि निराशाजनक वर्षांपैकी एकाचा अनुभव घेतला. कारण प्रशासकीय निष्क्रियता, आर्थिक अनिश्चितता आणि मैदानातील अपयशामुळे हा खेळ अधिकच संकटात सापडला. महिला आणि कनिष्ठ संघांनी मिळवलेल्या यशाच्या काही क्षणिक क्षणांनी क्रीडाप्रेमींचे लक्ष थोडक्यात वेधले असले तरी, संपूर्ण परिसंस्था गोंधळातच गुरफटलेली राहिली आणि भारतीय फुटबॉलला नवसंजीवनी मिळण्यासाठी कोणताही ठोस आराखडा दिसून आला नाही.
वरिष्ठ पुरुष फुटबॉल संघाकडून घोर निराशा
भारतीय वरिष्ठ पुरुष फुटबॉल संघाच्या कामगिरीचा आलेख हा याही वर्षी उतरताचा राहिलेला पहायला मिळाला. ज्यामुळे २०२४ मध्ये आधीच समोर आलेल्या चिंता अधिकच वाढल्या आहे. जरी या संघाने या वर्षी काही विजय मिळवले. यात सप्टेंबरमध्ये ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानमधील सीएएफए नेशन्स कपमध्ये कांस्यपदक जिंकण्याचा समावेश आहे. तरीही त्या निकालांमुळे केवळ क्षणिक दिलासा फुटबॉलप्रेमींना मिळाला.
खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या असलेल्या सामन्यांमध्ये भारत अपयशी ठरला. सर्वात वेदनादायक धक्का नोव्हेंबरमध्ये ढाका येथे बसला. एएफसी आशियाई कप २०२७ च्या पात्रता फेरीत राष्ट्रीय संघाला बांगलादेशकडून १-० असा पराभव पत्करावा लागला होता. जो २२ वर्षांनंतर भारताचा आपल्या शेजारी देशाकडून पहिला पराभव होता.
शेख मोर्सलिनने सुरुवातीलाच गुरप्रीत सिंग संधूच्या पायाखालून चेंडू मारून केलेला गोल, संघाची असुरक्षितता आणि प्रादेशिक वर्चस्वाची झालेली घसरण याचे प्रतीक बनला.या निकालामुळे, हाँगकाँग आणि सिंगापूरकडून झालेल्या पराभवांसह, भारताला २०११ नंतर प्रथमच एएफसी आशियाई कपसाठी पात्र ठरण्यात अपयश आले. ज्यामुळे फिफा क्रमवारीत भारताची आणखी घसरण झाली.
जरी भारताने २०२४ च्या विजयाविना मोहिमेपेक्षा अधिक विजय नोंदवले असले तरी, सातत्य, गोल आणि दबावाच्या परिस्थितीत संयमाचा अभाव हेच या वर्षाचे खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य ठरले.
आयएसएल ठप्प, भारतीय फुटबॉलचे भवितव्य अंधारात
फुटबॉल मैदानाच्या बाहेरची परिस्थिती तर त्याहूनही अधिक चिंताजनक होती. ८ डिसेंबर रोजी फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) सोबतचा करार संपल्यानंतर अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ) ला इंडियन सुपर लीग (आयएसएल) साठी नवीन व्यावसायिक भागीदार मिळवण्यात अपयश आल्याने भारतीय फुटबॉल एका खोल प्रशासकीय संकटात अडकले. याचे परिणाम तात्काळ आणि गंभीर होते. आयएसएल जी आतापर्यंत आपल्या हंगामाच्या मध्यावर असायला हवी होती, ती स्थगितच राहिली. प्रायोजकांनी माघार घ्यायला सुरुवात केली, क्लबचे कामकाज थांबले आणि फुटबॉलपटूंना करार व उपजीविकेबद्दल वाढत्या अनिश्चिततेचा सामना करावा लागला. या कोंडीमुळे खेळाला दीर्घकाळापासून ग्रासलेल्या गंभीर संरचनात्मक त्रुटी उघड झाल्या आहेत. ज्यात सुशासनाचा अभाव, दीर्घकालीन नियोजनाची कमतरता आणि शाश्वत युवा व व्यावसायिक व्यवस्था निर्माण करण्यात आलेले अपयश यांचा समावेश आहे.
न्यायालयीन खटल्यां दरम्यान 'गोट'चा (GOAT) देखावा
या वर्षात सर्वोच्च न्यायालयाच्या वारंवार सुनावण्या आणि केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा पुन्हा पुन्हा हस्तक्षेप यामुळे या संकटाची गांभीर्यता अधोरेखित झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही खेळाच्या उन्नतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन फुटबॉलच्या संबंधितांना केले. जे सर्वोच्च पदावरून आलेले एक दुर्मिळ आणि सूचक आवाहन होते.
सप्टेंबरमध्ये जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायाधीश एल. नागेश्वर राव यांनी तयार केलेल्या एआयएफएफ (AIFF) घटनेच्या मसुद्याला मंजुरी दिली. तेव्हा अखेरीस सहमतीवर आधारित तोडगा निघेल अशी सावध आशा निर्माण झाली होती. पण त्यानंतरच्या महिन्यांत फारशी प्रगती न झाल्याने ती आशा मावळली.
या निराशाजनक परिस्थितीत लिओनेल मेस्सीच्या 'गोट टूर ऑफ इंडिया'ने फुटबॉलभोवतीची लोकांची आवड आणि चर्चा काही काळासाठी पुन्हा जागृत केली. कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर पहिल्याच दिवशी झालेली गोंधळाची आणि कायदा-सुव्यवस्थेच्या भंगाची घटना अत्यंत लाजिरवाणी ठरली असली तरी, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली येथील उर्वरित मेस्सीचा दौरा हा सुरळीत पार पडला.
मेस्सीच्या भारत दौऱ्याने प्रेक्षणीय क्षण दिले. पण अपेक्षेप्रमाणे, त्याने भारतीय फुटबॉलच्या पद्धतशीर समस्यांवर कोणताही ठोस उपाय दिला नाही, जरी या अर्जेंटिनाच्या दिग्गजाने भारताचे या खेळात उज्ज्वल भविष्य असल्याचे म्हटले असले तरी.
महिला संघ आणि ज्युनियर फुटबॉल संघाने दाखवला आशेचा किरण
निराशाजनक वर्षात महिला राष्ट्रीय संघ आणि ज्युनियर संघांच्या कामगिरीने आशावादाची खरी कारणे दिली आहेत. जुलैमध्ये चियांग माई येथे भारतीय महिला संघाने प्रथमच एएफसी महिला आशियाई कप २०२६ साठी थेट पात्र ठरून इतिहास रचला.अंतिम सामन्यात यजमान आणि प्रादेशिक बलाढ्य थायलंडचा सामना करताना, भारताने संयमी खेळ केला आणि संगीता बासफोरेच्या दोन गोलमुळे एक ऐतिहासिक विजय निश्चित झाला.
क्लब स्तरावर, इंडियन वुमेन्स लीगची विद्यमान विजेती ईस्ट बंगाल एफसी, एएफसी महिला चॅम्पियन्स लीगमध्ये मुख्य ड्रॉचा सामना जिंकणारी पहिली भारतीय संघ बनली आणि पुढील हंगामाच्या लीग टप्प्यात थेट स्थान मिळवले.
ज्युनियर संघांनीही चांगली कामगिरी केली. श्रीलंकेत झालेल्या एका रोमांचक मुकाबल्या २-२ बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये बांगलादेशला पराभूत करत भारताने आपला सातवा सॅफ (SAFF) १७ वर्षांखालील चॅम्पियनशिप किताब जिंकला. बिबियानो फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली, १७ वर्षांखालील संघाने त्यानंतर इराणवर २-१ असा सनसनाटी विजय मिळवून १०व्या एएफसी १७ वर्षांखालील आशियाई कप फायनलसाठी पात्रता मिळवली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे