
बीड, 24 डिसेंबर (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्याच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. थंडीचा कडाका अचानक वाढला आहे. जिल्ह्यात किमान तापमान १३ ते १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने नागरिक ठिकठिकाणी शेकोट्यांचा आधार घेत आहेत. २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत हवामान कोरडे राहणार आहे. थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नोव्हेंबर अखेरपर्यंत हुलकावणी देणाऱ्या थंडीने डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात मात्र जिल्हावासियांनी चांगलेच जेरीस आणले आहे. या महिन्यात किमान तापमानाचा पारा दोन वेळा ११ अंशावर खाली उतरला आहे. विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी बोचरी थंडी जाणवत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डोंगराळ पट्टयात थंडीचा प्रभाव अधिक आहे. रब्बी पिकांसाठी हे हवामान पोषक मानले जात आहे. मात्र, बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी कडक ऊन आणि रात्री कडाक्याची थंडी असे दुहेरी वातावरण सध्या जिल्ह्यात अनुभवायला मिळत आहे.
थंडीमुळे हरभरा आणि गहू या पिकांना फायदा होणार आहे. पिकांवर पडणाऱ्या दवबिंदूंमुळे कीड रोखण्यासाठी योग्य फवारणी करावी. पहाटे फिरताना उबदार कपड्यांचा वापर करावा. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांना थंड वाऱ्यापासून स्वतःचा बचाव करावा लागणार आहे.
-------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis