
कंधमाल, 25 डिसेंबर (हिं.स.) । ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील बेलघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गुम्मा जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात एका महिला नक्षलीसह 3 माओवादी ठार झाले आहेत. ठार झालेल्या 2 नक्षलवाद्यांची ओळख बारी उर्फ राकेश आणि अमृत अशी असून, त्यांच्यावर एकूण 23.65 लाख रुपयांचे बक्षीस होते.बेलघर पोलीस ठाण्याच्या परिसरातील गुम्मा जंगलात बुधवारी रात्री उशिरा ही चकमक झाली. पोलिसांनी गुरुवारी माहिती दिली की, कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एका महिला कॅडरसह तीन माओवादी ठार झाले आहेत.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठार झालेल्या दोन पुरुष नक्षलवाद्यांची ओळख सीपीआय (माओवादी) संघटनेतील एरिया कमिटी मेंबर बारी उर्फ राकेश आणि दलम सदस्य अमृत अशी झाली आहे. हे दोघेही छत्तीसगडचे रहिवासी होते. या दोघांवर मिळून 23.65 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. गुरुवारी सकाळी चकमकीच्या ठिकाणाजवळून आणखी एका महिला कॅडरचा मृतदेह सापडला असून, तिची ओळख अद्याप पटलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा पोलिसांच्या एसओजी (स्पेशल ऑपरेशन ग्रुप)च्या एका लहान मोबाइल पथकाने जंगलात शोधमोहीम सुरू केली असता, त्यांचा माओवाद्यांशी सामना झाला.
चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला, ज्यात माओवादी ठार झाले. दोन पुरुष कॅडरचे मृतदेह तात्काळ ताब्यात घेण्यात आले, तर एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह नंतर काही अंतरावर आढळून आला. पोलिसांनी एक रिव्हॉल्व्हर, एक थ्री-नॉट-थ्री रायफल आणि एक वॉकी-टॉकी संच जप्त केला आहे.या चकमकीत सुरक्षा दलांकडील कोणतीही जीवितहानी झाली नाही. परिसरात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. ही चकमक शेजारच्या मलकानगिरी जिल्ह्यात 22 माओवाद्यांनी ओडिशाचे डीजीपी वाय. बी. खुराणा यांच्यासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घडली आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी