
पुणे, 25 डिसेंबर (हिं.स.)। विजयस्तंभ पेरणेफाटा येथील कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहण्याकरिता ३१ डिसेंबर २०२५ राेजी सकाळी १० वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२६ राेजी रात्री १२ वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्याबाबतचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
चाकण ते शिक्रापूर-शिक्रापूर ते चाकण या दोन्ही बाजुकडील वाहतुकीस सर्व प्रकारच्या खाजगी चालकांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. या मार्गावर अनुयायांच्या बसेसना प्रवेश देण्यात येणार आहे. तथापि अनुयायांच्या कार, जीप आदी हलक्या वाहनांना प्रवेश असणार नाही.
चाकण आळंदी फाटा, भारतमाता चौक, मोशी चौक, पांजरपोळ चौक येथून आळंदीकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या खाजगी जड अवजड, मल्टी अॅक्सल वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
मुंबईकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची (जड वाहने, माल वाहतूक (टेम्पो,ट्रक) वाहने वडगाव मावळ-एचपी चौक म्हाळुंगे-वासोली फाटा किंवा वाघजाई नगर मार्गे -बिरदवडी गाव-रोहकल फाटा- पुणे नाशिक रोड-खेड-मंचर नारायणगाव- आळेफाटा मार्गे अहिल्यानगर येथे जातील. खाजगी हलकी वाहने वडगाव मावळ येथून तळेगाव चाकण रोडने चाकण चौक-खेड- पाबळ -शिरुर मार्गे अहिल्यानगर येथे जातील. आळंदी, कोयाळी आदीमार्गे रसिका हॉटेल चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांना शिक्रापूर दिशेने जाण्यास बंदी करण्यात येणार असून ही खाजगी वाहने चाकण मार्गे इच्छितस्थळी जातील.
मुंबईकडून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने सेंट्रल चौक देहूरोडमार्गे निगडी-पिंपरी चिंचवड बाजुकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना मनाई करण्यात येणार असून या मार्गावरील वाहतूक सेंट्रल चौकातून मुंबई-बंगळरु महामार्गाने सरळ वाकड नाका चांदणी चौकमार्गे इच्छितस्थळी जातील. मुंबईकडून एक्सप्रेस महामार्गाने पुणे बाजुकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना उर्से टोलनाका येथुन मुंबई-बंगळरु महामार्गाने मुकाई चौक सेंट्रल चौक मार्गे निगडी-पिंपरी चिंचवड बाजुकडे जाण्यास मनाई करण्यात येणार असून या मार्गावरील वाहने वाकड नाका व राधा चौक येथुन पुणे बाजुकडे जातील.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु