अमरावती - अंजनगाव शहरात दूषित पाणीपुरवठा
अमरावती, 25 डिसेंबर, (हिं.स.) शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत गेल्या काही दिवसांपासून शहराला पुरवठा करण्यात येणारे पाणी गढूळ, चिखलयुक्त आणि दूषित स्वरूपाचा होत असल्याने प्राधीकरणामार्फत नागरिकांच्या आरोग्याशी सरळसरळ खेळ सुरु असल्याचा आरोप हो
अंजनगाव शहरात दूषित पाणीपुरवठा ! पाणी पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर


अमरावती, 25 डिसेंबर, (हिं.स.) शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत गेल्या काही दिवसांपासून शहराला पुरवठा करण्यात येणारे पाणी गढूळ, चिखलयुक्त आणि दूषित स्वरूपाचा होत असल्याने प्राधीकरणामार्फत नागरिकांच्या आरोग्याशी सरळसरळ खेळ सुरु असल्याचा आरोप होत आहे. महाराष्ट्र प्राधिकरणामार्फत जीवन स्वच्छ पाण्याऐवजी मातीमिश्रित गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने शहरवासीयांमध्ये तीछ रोष उसळला आहे

शहरातील बहुतांश भागात हीच स्थिती असून पिण्यायोग्य पाण्याऐवजी रोगाचे आमंत्रण देणारे पाणी नागरिकांच्या नशिबी आले आहे. पाणी उकळूनही त्याचा रंग व वास जात नसल्याने अनेक कुटुंबांनी हे पाणी पिण्यास नकार दिला आहे. परिणामी लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये पोटाचे विकार, उलट्या, जुलाब तसेच संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, शहरातील नागरिक नियमितपणे पाणीपट्टी व कर भरत असतानाही त्यांना मूलभूत सुविधा असलेल्या शुद्ध पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. जलशुद्धीकरण केंद्राची योग्य देखभाल न होणे, पाईपलाईनमधील गळती, तसेच गाळ काढण्याकडे होत असलेले दुर्लक्ष हे सर्व जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ व निष्काळजी कारभाराचे ज्वलंत उदाहरण असल्याची टीका होत आहे. नागरिकांनी अनेकदा तोंडी व लेखी तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून फक्त आश्वासनांपलीकडे काहीच झालेले नाही प्रशासनाची ही उदासीन भूमिका पाहता कोणाच्या मृत्यूनंतर कारवाई होणार का?' असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. गढूळ पाणीपुरवठ्यामुळे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

स्वयंपाक, पिणे, अंघोळ. कपडे धुणे यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून अनेकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भारही वाढत आहे. तरी तत्काळ गढूळ पाणीपुरवठा बंद करण्यात यावा, पाणी नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात यावे, जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, शहराला कायमस्वरूपी स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी नागरिकांमार्फत मागणी होत असताना प्राधीकरणामार्फत दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांद्वारे शहरातील प्रशासनाला देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande