
पुणे, 25 डिसेंबर, (हिं.स.)। फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपोतील २८ लाख टन कचऱ्याचे जैविक उत्खनन (बायोमायनिंग) १५४ कोटी रुपयांत पूर्ण होणार आहे. गेल्या वर्षीच्या दराचा विचार करता, या कामासाठी तब्बल २७४ कोटी रुपये लागणार होते.
पण हे काम केंद्र सरकारने दिलेल्या १५४ कोटी रुपयांमध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुणेकरांची १२० कोटी रुपयांची बचत झालीच आणि महापालिकेच्या तिजोरीतून एकही पैसा खर्च होणार नाही, असा दुहेरी फायदा पुणेकरांचा झाला आहे.
कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यासाठी प्रतिटन ५५० रुपये टिपिंग शुल्क या दराने चार कंपन्यांच्या निविदांना स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत करारनामा करून पुढील दीड-दोन महिन्यांत काम सुरू करण्यात येणार आहे. या निविदेसाठी मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४२९ रुपयांना कमी दर आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु