टांझानियातील माउंट किलिमांजारोवर हेलिकॉप्टर कोसळून अपघात; पाच जणांचा मृत्यू
डोडोमा, 25 डिसेंबर (हिं.स.)।टांझानियामध्ये आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत असलेल्या माउंट किलिमंजारोवर हेलिकॉप्टर कोसळून अपघात घडला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या पर्वतारोहण मार्
टांझानियातील माउंट किलिमांजारोवर हेलिकॉप्टर कोसळून अपघात


डोडोमा, 25 डिसेंबर (हिं.स.)।टांझानियामध्ये आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत असलेल्या माउंट किलिमंजारोवर हेलिकॉप्टर कोसळून अपघात घडला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या पर्वतारोहण मार्गांपैकी एका मार्गावर झाला. पोलिसांनी हा अपघात पर्वतावर अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेदरम्यान घडल्याचे सांगितले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये किलिमंजारोवरून वैद्यकीय मदतीसाठी बाहेर काढण्यात आलेले दोन परदेशी नागरिक समाविष्ट आहेत. या अपघातात एका स्थानिक डॉक्टर, एका टूर गाइड आणि एका वैमानिकाचाही मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितले की हा अपघात पर्वतावरील बाराफू कॅम्प आणि किबो शिखर यांच्या दरम्यान, सुमारे 4,000 मीटर (13,100 फूट) पेक्षा अधिक उंचीवर झाला.पोलिसांनी स्पष्ट केले की दोन परदेशी नागरिकांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या बचाव कारवाईदरम्यानच हा हेलिकॉप्टर अपघात झाला.

किलिमंजारो प्रादेशिक पोलीस कमांडर सायमन माईग्वा यांनी पत्रकारांना सांगितले की हे हेलिकॉप्टर किलिमंजारो एव्हिएशन कंपनीचे होते. ही कंपनी इतर सेवांसह वैद्यकीय आपत्कालीन स्थलांतर (मेडिकल इव्हॅक्युएशन) सेवा देखील पुरवते. मात्र, कंपनीकडून अद्याप या दुर्घटनेबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. पोलिसांनी सांगितले की अपघाताबाबत अधिक माहिती समोर आल्यानंतर जनतेला कळवण्यात येईल. अपघाताची कारणे शोधण्यासाठी तपास सुरू असून, एक पोलीस पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

बुधवारी सायंकाळी किलिमंजारो पर्वतावर झालेला हा अपघात धक्कादायक मानला जात आहे. वास्तविक, किलिमंजारो पर्वत परिसरात सहसा विमान अपघात फारच कमी प्रमाणात होतात. यापूर्वी नोव्हेंबर 2008 मध्ये येथे एक विमान दुर्घटना घडली होती, ज्यात चार जणांचा मृत्यू झाला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande