
लंडन , 25 डिसेंबर (हिं.स.)।पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचे निकटवर्तीय सहकारी आणि त्यांच्या कार्यकाळात उत्तरदायित्व सल्लागार म्हणून कार्यरत असलेले मिर्झा शहजाद अकबर यांच्यावर ब्रिटनमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला ब्रिटनमधील केम्ब्रिज शहरात त्यांच्या घराजवळ झाला, जिथे नकाबधारी हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.या हल्ल्यात अकबर यांच्या चेहऱ्यावर अनेक घाव घातले गेले, ज्यामुळे त्यांची नाक दोन ठिकाणी तुटली असून जबड्याला हेअरलाइन फ्रॅक्चर झाले आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, हा हल्ला पूर्णपणे पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला आहे. पक्षाच्या मते, हल्लेखोराने मास्क, हातमोजे आणि ओव्हरकोट परिधान केले होते, यावरून हा हल्ला आधीच आखून करण्यात आल्याचे स्पष्ट होते. पीटीआयचा दावा आहे की, मिर्झा शहजाद अकबर हे पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्यावर सातत्याने टीका करत असल्याने, त्यांच्या इशाऱ्यावरच हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा अकबर यांचे अलीकडील भाषण सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होते. लंडनमधील पाकिस्तान हाय कमिशनबाहेर झालेल्या एका आंदोलनादरम्यान त्यांनी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्यावर तीव्र टीका केली होती. आपल्या भाषणात अकबर यांनी म्हटले होते की, गेल्या साडेतीन वर्षांपासून मुनीर हे पाकिस्तानवर भीती आणि दहशतीच्या माध्यमातून राज्य करत आहेत.
मिर्झा शहजाद अकबर 2022 मध्ये इम्रान खान यांचे सरकार पडल्यापासून ब्रिटनमध्ये स्वनिर्वासित जीवन जगत आहेत. पाकिस्तान सरकार त्यांना अनेक प्रकरणांमध्ये आरोपी मानते आणि अलीकडे त्यांचे प्रत्यार्पण करण्याचे प्रयत्न अधिक तीव्र झाले आहेत. डिसेंबर महिन्यात पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना प्रत्यार्पणासंदर्भातील कागदपत्रे सुपूर्द केली होती. यामध्ये नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB), फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA) तसेच इतर तपास संस्थांशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे. पाकिस्तानी न्यायालयाने अकबर यांना फरार आरोपी घोषित केले आहे. ब्रिटनमध्ये मिर्झा शहजाद अकबर यांच्यावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी 2023 मध्ये हर्टफोर्डशायर येथे त्यांच्या घरावर अॅसिड हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि हातांवर गंभीर भाजल्या जाण्याच्या जखमा झाल्या होत्या. त्या वेळीही अकबर यांनी पाकिस्तानी सरकारवर आरोप केले होते, मात्र नंतर ब्रिटिश पोलिसांनी त्या प्रकरणाची चौकशी बंद केली होती. अकबर यांचे समर्थक आणि पीटीआय नेत्यांनी या हल्ल्याला पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाकडून परदेशात राहणाऱ्या टीकाकारांना लक्ष्य करण्याचे उदाहरण म्हटले आहे.
मानवाधिकार संघटनांनीही या घटनेबाबत चिंता व्यक्त करत, राजकीय मतभेद दडपण्यासाठी सीमापार दडपशाहीच्या घटना वाढत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, ब्रिटिश पोलिसांनी या हल्ल्याची चौकशी सुरू केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुरावे सुरक्षित करण्यात आले आहेत. हल्ल्यानंतर मिर्झा शहजाद अकबर यांनी सांगितले की, ते जखमी जरूर आहेत, मात्र खचलेले नाहीत, आणि पारदर्शकता व उत्तरदायित्वासाठीची लढाई पुढेही सुरूच राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode