
सोलापूर, 25 डिसेंबर (हिं.स.)। निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना अजूनही कोणत्याच पक्षाने अधिकृत उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. महायुतीची घोषणा खोळंबली असून महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झालेले नाही. यामुळे उमेदवारांची यादी जाहीर होणे लांबले असून इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सुट्ट्या वगळता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे चार दिवस राहिले आहेत. तरीही सोलापुरात कोणत्याच पक्षातने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती होणार की नाही याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र राज्य पातळीवर 29 महापालिकेसाठी भाजप सेनायुतीची बोलणी सुरू आहे. त्यामुळेसोलापुरातील दोन्ही पक्षातील नेते अजूनही वेटिंगवर आहेत. युती न झाल्यास दोन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. मात्र भाजपमधील बंडखोर आणि तगडे उमेदवार गळाला लावण्यासाठी शिवसेना वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची उमेदवारी यादी लांबली आहे.भाजपमधून उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांची प्रचंड मोठी संख्या आहे त्यामुळे बंडखोरी रोखण्यासाठी भाजपा शेवटच्या दिवशी उमेदवारी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे किंवा थेट शेवटच्या दिवशी एबी फॉर्म देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड