
सोलापूर, 25 डिसेंबर (हिं.स.)।महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासोबत उमेदवारांना विविध खात्याची नाहरकत प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. नाहरकत प्रमाणपत्रांसाठी अर्ज देणे आणि ही प्रमाणपत्रे घेण्यासाठी इंद्रभुवनात बुधवारी दिवसभर मोठी गर्दी होती. वाहने लावायला जागा नव्हती. अनेकांनी ही प्रमाणपत्रे वेळेवर मिळत नसल्याची तक्रार केली.
महापालिका प्रशासनाने नाहरकत प्रमाणपत्रे देण्यासाठी नॉर्थकोटमध्ये एक खिडकी कक्ष सुरू केला. हा कक्ष मंगळवारपासून प्रशासकीय इमारतीमध्ये हलविण्यात आला. नॉर्थकोटमध्ये ज्यांचे अर्ज भरुन घेतले. त्यापैकी काहीजणांना पुन्हा अर्ज करायला सांगण्यात आले. उमेदवारांना कर संकलन विभाग, गवसु विभागाची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. नगर अभियंता विभागाकडून मक्तेदार नसल्याचे प्रमाणपत्र, भूमी व मालमत्ता विभागाकडून गाळे अथवा जागा भाड्याने घेतली नसल्याचा दाखला आणि घरात शौचालय असल्याचा दाखला देणे आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड