
सोलापूर, 25 डिसेंबर (हिं.स.)। मागील काही दिवसांपासून जागावाटपाबाबत रस्सीखेच सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस पक्षाला ५० ते ५५, उद्धवसेनेला २७ ते २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १७ ते १८, तर कम्युनिष्ठ पक्षास ९ ते १० जागा देण्यास समन्वयातून ठरलं असल्याचेही सांगण्यात आले. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाची सत्ता रोखण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे.
भाजपविरोधातील सर्वच पक्ष एकत्रित आले आहेत. रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर चर्चा झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धवसेना, माकप पक्षातील नेते एकत्रित आले होते. पहिल्या बैठकीत प्रभागनिहाय उमेदवारांवर चर्चा झाली. कोणत्या जागा कोणत्या पक्षासाठी योग्य आहेत त्यावरही काहींनी मत व्यक्त केले. यावर सकारात्मक चर्चा झाली होती. या चर्चेतील माहिती बैठकीसाठी उपस्थित असलेल्या नेत्यांनी वरिष्ठांना कळविली. वरिष्ठांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर बुधवारी महाविकास आघाडीची बैठक झाली असून या बैठकीत जागावाटपावर अंतिम निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड