

अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.)।
महापालिका निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल पूर्णतः सज्ज आहे. प्रतिबंधात्मक कारवाई, गस्त, गुन्हेगारांवर लक्ष आणि कायद्याचा भंग होणार नाही, यासाठी कठोर उपाययोजना राबविण्यात येतील, असे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी स्पष्ट केले.आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, आदर्श आचारसंहितेची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडणे इत्यादी मुद्यांवर बुधवारी अमरावती महानगरपालिकेतील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात निवडणूक कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यावेळी उपस्थित होत्या. निवडणूक काळात निर्माण होऊ शकणाऱ्या विविध आव्हानांचाआढावा घेत प्रशासन व पोलीस यंत्रणेतील समन्वय अधिक प्रभावी करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रे, निवडणूक प्रचारादरम्यान कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकणाऱ्याबाबी, मिरवणुका, सभा, रॅली तसेच सोशल मीडियावरील अफवा व गैरप्रचार यावर नियंत्रण ठेवण्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले.निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी, मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा व सुरक्षा उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगितले.बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त, पोलीस उपायुक्त, महानगरपालिका उपायुक्त, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी