
पुणे, 25 डिसेंबर (हिं.स.)।:पुणे शहराची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता जलसंपदा विभागाने मुळशी धरणातून सात टीएमसी पाणी वापरास मान्यता दिली आहे. याचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर महापालिकेला या पाण्याचा वापर करता येणार आहे. या निर्णयामुळे पुणे शहराला मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यानुसार आवश्यक असलेले पाणी खडकवासला प्रकल्पातून अपुरे पडत आहे. त्यासाठी मुळशी धरणातून वाया जाणारे पाणी बिगर सिंचनासाठी वापरता येईल, असा आग्रह उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी अनेक वर्षांपासून लावून धरला आहे. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, मुळशी धरणातून वाया जाणाऱ्या सुमारे सात टक्के पीएमसी पाण्याचा वापर करण्यास जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांनी मान्यता दिली आहे. याचा सविस्तर प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांकडे पाठवण्यात आला आहे. कार्यकारी संचालकांनी हा प्रस्ताव मान्य करून राज्य सरकारकडे पाठवावा, अशी विनंतीदेखील यात करण्यात आली आहे. राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचा प्राथमिक अन्वेषण अहवाल मान्य करून त्यानंतर त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु