
पुणे, 25 डिसेंबर, (हिं.स.)। सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत विविध शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या ३ हजार ५६२ कर्मचाऱ्यांची १२० कोटी ९० लाख १७ हजार २२९ रुपये भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम संस्थेने जमा केली नाही. मार्च २०१४ ते डिसेंबर २०१८ या कालावधीतील ही रक्कम येत्या दोन महिन्यांत ती कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये जमा करावी. अन्यथा सोसायटीने मालमत्तेची जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा आदेश प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी दिला आहे.
तसेच, सोसायटीने खोटी कागदपत्रे सादर केल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्याचाही आदेश त्यांनी दिला. पुण्याचे विभागीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ यांनी हा आदेश दिला आहे. भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा न केल्याप्रकरणी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अंमलबजावणी अधिकाऱ्यामार्फत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भविष्य निर्वाह निधी विभागाने प्रकरणाची चौकशी केली. तसेच याबाबत सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने वित्त संचालक व इतरांचा व तक्रारदार कर्मचाऱ्यांचे जबाबही नोंदवले होते. दोन्ही बाजूची साक्ष, युक्तिवाद, कागदोपत्री पुरावे पाहून आयुक्तांनी हा आदेश दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु