
पुणे, 25 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका निवडणुकांना एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला असला तरी, आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांचे जागा वाटप जवळपास पूर्ण झाले आहे. त्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला ९१, तर मनसे ७४ जागांवर संधी देण्याबाबत दोन्ही पक्षांत एकमत झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सोबत राहणार की मनसेच्या इंजिनमध्ये बसून युतीच्या माध्यमातून रिंगणात उतरणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. बुधवारी दोन्ही पक्षांनी एकत्र येत असल्याचे अधिकृत जाहीर केले; परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दोन्ही पक्षांच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत बैठका सुरू होत्या. त्यानुसार मंगळवारी रात्री जागा वाटपाबाबत अंतिम बैठक झाली.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला काँग्रेसने मनसेला आघाडीत सामील करून घेण्यास विरोध केला आहे; तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना हे मात्र आग्रही आहेत. जागा वाटपाच्या चर्चेत आघाडीमध्ये शिवसेनेला ज्या जागा सुटतील, त्यापैकी काही जागा त्यांनी मनसेला द्याव्यात, असा तोडगा त्यावर काढण्यात आला होता. त्यानुसार आघाडीतील जागा वाटपाच्या दोन ते तीन बैठकीत चर्चाही झाली. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे मूळ घटक पक्ष असलेल्या आघाडीतील तिन्ही पक्षांतील बैठकांना ब्रेक लागला. एकीकडे काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका सुरू असताना, दुसरीकडे शिवसेना-मनसे यांच्यादेखील जागा वाटपाबाबत स्वतंत्र बैठका सुरू होत्या. या बैठकांमधील चर्चेनंतर मंगळवारी रात्री जागा वाटपावर एकमत झाले. त्यामध्ये शिवसेनेला ९१ जागा, तर मनसेने ७४ जागा वाटपात आल्या असल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. जागावाटप निश्चित झाले असले तरी, चार ते पाच जागांवर अद्यापही एकमत झालेले नाही, त्यावर स्वतंत्र तोडगा काढण्यावर एकमत करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे दोन्ही पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु