
पुणे, 25 डिसेंबर (हिं.स.)। भाजपाचा प्रवेश महोत्सव महाराष्ट्रात गाजत असून महापालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण पुरते ढवळून निघाले आहे. पुण्यातील तब्बल बावीस नगरसेवकांच्या जंबो प्रवेशाने तर राजकीय समीकरणे पुरती बिघडून गेली आहेत, त्याला धनकवडीही अपवाद राहिलेली नाही. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धनकवडीला भारतीय जनता पक्षाचे सुरूंग लावला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावंत शिलेदार असलेले माजी नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे यांना गळाला लावले आणि त्यांचा भाजपा प्रवेश पार झाला आहे.
धनकवडे यांनी मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. दक्षिण उपनगरातील नवीन प्रभाग क्रमांक ३७ धनकवडी कात्रज डेअरीमध्ये धनकवडे यांच्या प्रवेशाची मागील दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती, त्यावर आज शिक्कामोर्तब झाल्यामुळे शेवटच्या क्षणी धनकवडीतील राजकीय वातावरण एकदम ३६० डिग्रीत बदलल्याची स्थिती आहे. या संदर्भात लोकमतने पंधरा दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु