
अकोला, 26 डिसेंबर (हिं.स.)। रब्बी हंगाम ई पीक पाहणीची सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी 24 जानेवारी 2026पूर्वी आपल्या पिकांची नोंदणी फोनद्वारे करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा निमा यांनी केले आहे.
आतापर्यंत अत्यल्प नोंदणी!
ई- पीक पाहणीत शेतक-यांनी स्वत: 7/12 वर पीक पेरा अँड्रॉइड फोनव्दारे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेवटची तारीख 24 जानेवारी आहे. अकोला जिल्ह्यात एकूण 3 लक्ष 81 हजार 714 ओनर प्लॉटची संख्या असून, त्यापैकी 12 हजार 753 ओनर प्लॉटची नोंदणी झाली आहे. हे प्रमाण 3.34 टक्के इतकेच आहे.
अकोला जिल्ह्यात डिजिटल क्रॉपसर्व्हेअंतर्गत ई पीक पाहणीची नोंदणी 15 हजार 776.43 हे.क्षेत्रावर रब्बी पिकाची नोंद झाली असून, उर्वरित क्षेत्रावर नोंदणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी अॅपद्वारे पीकांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पीक पाहणीची नोंदणी ‘ई पीक पाहणी व्हर्जन 4.0.5’ या मोबाईल अॅपद्वारे होते. ते प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. ई पीक पाहणी अॅपद्वारे शेत बांधावर जावुन पिकांची नोंदणी करून माहिती अपलोड करावी.
*अडचण आल्यास स्थानिक कर्मचा-यांची मदत घ्यावी*
त्यासाठी संबंधित शेतक-याजवळ मोबाईल उपलब्ध नसल्यास अथवा हाताळता येत नसल्यास, संबंधित गावाचे ग्राम महसूल अधिकारी, कोतवाल तसेच संबंधित गावात नियुक्त केलेले सहायक यांची मदत घेऊन आपल्या पीकांची नोंदणी ई पिक पाहणी अॅप व्दारे करून घेण्यात यावी. सदर अॅप विषयी काही अडचण असल्यास संबंधीत गावाचे ग्राम महसूल अधिकारी तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर, आपल्या गावातील डीसीएसकरिता नियुक्त सहाय्यक यांची मदत घ्यावी. ऑनलाईन नोंद केल्यावर 48 तासानंतर त्या नोंदीसह अद्ययावत सातबारा उपलब्ध होईल.
ई पीक पाहणीद्वारे पीकांची नोंदणी न केल्यास आपल्या 7/12 वर पीक पेरा कोरा राहील. त्यामुळे पीक विमा, व इतर शासकीय अनुदान व लाभ मिळविण्यास अडचण निर्माण होते. अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीबाबत पीक विमा मिळण्यासाठी 7/12 वर अचूक पीक नोंद असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सर्व शेतकरी बांधवांनी 24 जानेवारी 2026 पूर्वी आपल्या पिकांची नोंदणी करून घेण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे