मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी कृतीतून संकल्प करूया – मुख्यमंत्री
* वीर बाल दिवसानिमित्त साहिबजाद्यांच्या शौर्याला नमन मुंबई, 26 डिसेंबर (हिं.स.) : शीख पंथीयांचे दहावे गुरू श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे) आणि साहिबजादे बाबा फतेह सिंग (वय ७ वर्षे) यांच्या अद्वितीय श
मुख्यमंत्री फडणवीस वीर बाल दिवस साहिबजादे नमन


* वीर बाल दिवसानिमित्त साहिबजाद्यांच्या शौर्याला नमन

मुंबई, 26 डिसेंबर (हिं.स.)

: शीख पंथीयांचे दहावे गुरू श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे) आणि साहिबजादे बाबा फतेह सिंग (वय ७ वर्षे) यांच्या अद्वितीय शौर्य व बलिदानाच्या स्मरणार्थ २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून पाळला जातो. वीर बाल दिवसाच्या निमित्ताने गुरूंनी दाखविलेल्या मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात अंगीकारण्यासाठी आपण स्वतःला कृतीतून संकल्पित केले पाहिजे. साहिबजाद्यांच्या धैर्याने आणि बलिदानाने भारतीय इतिहासाला नवी दिशा दिली असून, त्यांचे शौर्य सदैव पिढ्यान्‌पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सायन येथील गुरूद्वारा गुरू तेग बहादूर दरबार येथे वीर बाल दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर शहीद साहिबजादे यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या अद्वितीय शौर्याचे स्मरण केले. यावेळी गुरूद्वारा समितीच्या सदस्यांनी किर्तन, कविता वाचन केले आणि वीर शहीद साहिबजादे यांना आदरांजली अर्पण केली.

यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार तमिल सेल्वन, श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम समितीचे राज्यस्तरीय समन्वयक रामेश्वर नाईक, पंजाबी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष बल मलकित सिंह, गुरुद्वारा समितीचे सदस्य दलजीत सिंग, गुरुदेव सिंग, जसपाल सिंग सिद्धू, हॅपी सिंग, डॉ. अजयसिग राठोड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राष्ट्रासाठी आपले शीश समर्पित करणाऱ्या गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या महान बलिदानाला देश कधीही विसरणार नाही. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या संपूर्ण परिवाराने देश, संस्कृती आणि संस्कारांसाठी दिलेले बलिदान इतिहासात अजरामर आहे. २६ डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. गुरु तेग बहादूर यांनी शेवटपर्यंत आपले रक्षण केले असल्याने त्यांच्या इतिहास सर्वांनी कायम लक्षात ठेवावा.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दहावे गुरू श्री गुरू गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे) आणि साहिबजादे बाबा फतेह सिंग (वय ७ वर्षे) यांच्या अद्वितीय शौर्य व बलिदानाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. वीर बाल दिवसानिमित्त या वीर, शहीद साहिबजादांना नमन करून त्यांच्या जीवनातील दृढता, धैर्य आणि निष्ठा आपल्यातही यावी, अशी प्रार्थना आज गुरूंना करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, गुरू गोविंद सिंग यांच्या संपूर्ण परिवाराने दिलेली शहादत ही देशासाठी सदैव प्रेरणादायी राहिली आहे. इतके मोठे बलिदान सहन करूनही गुरू गोविंद सिंग आपल्या उद्दिष्टापासून कधीही विचलित झाले नाहीत. सर्व शीख गुरूंनी मानवतेसाठी, धर्मस्वातंत्र्यासाठी आणि मूल्यांच्या रक्षणासाठी कसे बलिदान दिले, याचे सर्वोत्तम उदाहरण त्यांनी संपूर्ण जगासमोर ठेवले. त्या काळातील क्रौर्य इतके भयानक होते की, साहिबजादे बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांसारख्या कोवळ्या वयातील बालकांनाही शहीद करण्यात आले. राज्य शासन गुरू तेग बहादूर यांचे शहीदी समागम वर्षही साजरे करीत आहे. ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरू तेग बहादूर यांनी देशासाठी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

गुरूबाणीच्या माध्यमातून ही महान परंपरा आजही आपल्याला जीवनाचा सन्मार्ग दाखवित आहे. गुरूंच्या विचारांतून जीवनाला अर्थ देण्याचा, मानवतेची सेवा करण्याचा संदेश सतत मिळतो. भारत देश आणि संपूर्ण मानवता कधीही या महान बलिदानांना विसरणार नाही. त्यांच्या त्यागामुळेच आज आपले अस्तित्व, पंथ, भाषा आणि संस्कृती टिकून आहे. त्यांच्या बलिदानापुढे आपण सर्वांनी नम्र होऊन नतमस्तक व्हायला हवे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, ज्यांच्या बलिदानामुळे आपले अस्तित्व आहे, त्यांचे कायम स्मरण ठेवणे हाच यशस्वी भविष्यासाठीचा मार्ग आहे, असे सांगितले आहे. साहिबजादांच्या शौर्याच्या स्मरणार्थ ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. आजच्या दिवशी गुरूंना आणि त्यांच्या परिवाराच्या बलिदानाला सामूहिकरित्या स्मरण करून, मानवतेच्या रक्षणासाठी सज्ज होण्याचा आणि गुरूंच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया. नानक, नामलेवा समाजाला जीवन जगण्याचा योग्य सन्मार्ग गुरूंमुळेच मिळाला, ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गौरवाची बाब आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande